‘इस प्रेमग्रंथ के पन्नों पर..’
‘घायल की गती घायल ही जाने’ असं कृष्णविव्हळ मीरानं म्हटलंय. तसंच प्रेमाचं असतं.
कारण प्रत्येक जण सहचरीवर प्रेम करतोच. संगीत, शिल्प, सिनेमा व फोटोग्राफी ही कलामाध्यमे प्रेमभाव प्रगट करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत, पण शब्दकळा या सर्व ललितकला आपल्या कलेत घेऊन जेव्हा प्रेमग्रंथ रचते, तेव्हा साहित्यातले दिलकश ताजमहाल उभे राहतात व ते पुस्तकरूपाने सदैव जवळ बाळगता येतात. मन चाहेल तेव्हा त्याचं दर्शन घेता येतं, अनुभती घेता येते आणि आपल्या प्रेमाचं रूपही त्या दर्पणी पाहता येतं!
एकेकाळी मराठी साहित्यात तारुण्यसुलभ प्रेमाचे ताज ना. सी. फडक्यांनी कादंबऱ्यांतून रचले होते. विदग्ध व त्यागमुलक प्रेमाचे उत्तुंग मनोरे शरदबाबूंनी त्यांच्या बंगाली कादंबरीतून रेखाटून भारतीयांना त्यागमय प्रेम कसं करावं, याचा वस्तुपाठच दिला. कवी अनिल व कुसुमावती देशपांडेंचं ‘कुसुमानील’ हा असाच एक अस्सल प्रेमग्रंथ!
अलीकडे मराठीत एक अजोड, माझ्या मते एकमेवद्वितीय असा प्रेमग्रंथ प्रसिद्ध झाला आहे, तो एवढा अपूर्व आहे की, त्याची सर्वदूर चर्चा व पारायण व्हायला हवी होती. एवढी सुरेख काव्यमय भाषाशैली, सुबोध पण मन रोमांचित करणारी शब्दकळा आणि उत्कट खोल तरी संयमी प्रेमाचं दर्शन मराठीत तरी दुर्मिळ आहे. आ. ह. साळुंके यांचं ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ हा प्रेमग्रंथ केवळ वाचनीय नाही, तर प्रत्येकाच्या मनातली प्रेमाची तार छेडणारा आहे. मी हे पुस्तक एकदा नव्हे अनेकदा वाचलंय आणि यापुढे ते सदैव माझ्याजवळ राहणार आहे. कारण केव्हाही कुठलंही पान उलगडावं आणि प्रेम व पती-पत्नीच्या रम्य सहजीवनाचा एक नवा वेगळा पैलू अनुभवा. मग पुस्तक मिटून आठवणीत रमून जावं. आपलंही सहजीवन व त्यातले खट्टे-मिठ्ठे प्रसंग आठवावेत आणि चिंब होऊन जावं!
खरं तर आ. ह. साळुंकेची मराठी जगताला ओळख आहे ती एक प्रखर बुद्धिमंत वैचारिक लेखक म्हणून. चार्वाक, ‘तुकाराम आणि गौतम बुद्धांवरील त्यांचे ग्रंथ मराठी भाषेचे अजोड ग्रंथ. पण ते संस्कृत साहित्याचे विद्यार्थी आहेत आणि कालिदास, भवभूती व भासाचे संदर्भ त्यांना पदोपदी पत्नीच्या वियोगाचं दु:ख प्रकट करताना आठवतात आणि त्यांचं सहजीवन त्या संस्कृत ग्रंथातील प्रकट होणाऱ्या प्रेम व इतर उत्कट मानवी भावभावनांच्या साथीनं फुललं व बहरत गेलं.
प्रस्तुत पुस्तक जरी मी मराठीतला ‘एक अपूर्व असा प्रेमग्रंथ’ म्हणत असलो तरी तो पहिल्या पृष्ठापासून अंतिम पृष्ठापर्यंत पत्नीवियोगाच्या कायमस्वरूपी शोकरसात बुडून निघालेला आहे. सुमारे ३०-३२ वर्षांच्या सहजीवनानंतर साळुंकेंच्या पत्नीचं कर्करोगाशी सामना करताना निधन झालं आणि त्यानंतर वर्षभरानं न राहवून साळुंकेंनी हे सलग लेखन केलं. जीवनाला ऊर्जा पुरविणारा एक अत्यंत महत्त्वाचा स्रोतच आटून गेल्यामुळे ते अनेकांगांनी निराधार झाले व मन मोकळं करण्यासाठी लेखनाचा मार्ग स्वीकारला. इतका व्यक्तिगत संवाद लेखनातून प्रकट करण्याबाबत काही काळ साळुंके साशंक होते, पण मराठी वाचकांचं अहोभाग्य की, त्यांनी ते केलं व आपल्याला एक अपूर्व ग्रंथ लाभला!
साळुंके यांनी पुस्तकाची सुरुवातच मुळी पत्नी विरही यक्षाच्या कालिदासप्रणीत ‘मेघदूत’च्या संदर्भात करीत पत्नीवियोगाच्या दु:खाचं प्रकटीकरण केलंय. तात्पुरत्या वियोगात सावरणं शक्य असतं कारण पुनर्मिलनाची खात्री असते, पण प्रिय व्यक्तीच्या मृत्यूनं होणाऱ्या वियोगाची गोष्ट वेगळी. तिथं सारं काही संपलेलं असतं. फक्त उरतात त्या आठवणी. त्या जाणवतात, पण अमूर्त असतात. त्या विसरायचा प्रयत्न केला तर एका भयाण निर्जीव पोकळीमध्ये निर्जीव जगावं लागतं. उलट सतत आठव केला तर अंत:करण पिळवटून निघालं तरी एकाकीपणाचं दु:ख काहीसं हलकंहोतं. साळुंकेंनी दुसरा मार्ग स्वीकारून आपल्या पत्नीबरोबरच्या आठवणींना काव्यमय उजाळा दिला आहे व त्यात जागोजागी संस्कृत काव्यांचे मनोरम संदर्भ आहेत.
साळुंके सर व त्यांच्या पत्नीच्या सहजीवनात वेगळं अघटित असं काही नव्हतं. परस्परांवर उत्कट प्रेम करणं हेच मुळी आजच्या काळात अघटित नाही का? या प्रेमग्रंथाच्या पाना-पानावर संस्कृत काव्याच्या संदर्भाच्या रत्नजडीत कोंदणीत साळुंके दाम्पत्याच्या जीवनातले काही नाजूक मनोरम क्षण व भावविश्व नजाकतीनं उलगडत जातं.
‘उदयन वीणा शिकवीत असताना त्याच्या प्रेमात बुडालेली वासवदत्ता त्याच्याकडे पाहत राहायची, वाद्यावरचा तिचा हात अलग व्हायचा आणि अवकाशाच्या पोक ळीत वाद्यवादन व्हायचं,’ अशा आशयाचा श्लोक उद्धृत करून साळुंके विवाहापूर्वी तिच्या भावाशी एकदा गप्पा मारताना ती कशी एकाग्रतेनं वाचत होती, हे सांगितलंय. पण खरं तर ती काही वाचत नव्हती. तिचं सारं लक्ष साळुंकेंकडे होतं. याबाबत वासवदत्तेच्या वीणावादनाचा संदर्भ देत ते लिहितात, ‘वासवदत्तेच्या मनाचं बोटावरचं नियंत्रण गेलं होतं व ते मन तिच्या डोळ्यांमध्ये केंद्रित झालं होतं. याउलट तुझ्या मनाचं डोळ्यांवरचं नियंत्रण गेलं होतं व ते तुझ्या कानांमध्ये केंद्रित झालं होतं. वासवदत्ता आपल्या डोळ्यांनी उदयनाचं रूप पिऊन घेत होती व तू तुझ्या कानांनी माझे शब्द पिऊन घेत होतीस.’
कालिदासानं ‘मेघदूत’मध्ये ‘विभ्रम हा स्त्रियांचा आपल्या प्रेमिकाविषयीच्या प्रणयाचा आद्य उद्गार असतो,’ असं म्हटलं आहे. साळुंके पत्नीला (अर्थात विवाहापूर्वी) संस्कृत शिकवीत होते. एके रात्री तिनं त्यांच्या हाती गुलाबाचं एक फूल ठेवलं. तेव्हा साळुंके म्हणतात, ‘तुझं माझ्याशी पुष्प विभ्रमाच्या रूपानं झालेलं सुस्पष्ट असं कालिदासाच्या भाषेतलं ‘आद्य प्रणयवचन’ त्या रात्री त्या गुलाबपुष्पाच्या रूपानं उच्चारलं गेलं!’ त्या गुलाबाच्या माध्यमातून त्यांना रूपरसगंधस्पर्शाची अनुभूती झाली आणि ध्वनीची पण. कारण त्यांनी ते गुलाबपुष्प हळुवारपणे आपल्या कानांच्या शेजारून गालावर फिरवलं तेव्हा निर्माण झालेला एक सूक्ष्म ध्वनी- तो प्रेमस्वर तर होता- त्यांनी जरूर कानांनी अनुभवला. त्या गुलाबाच्या पाकळ्यांच्या स्पर्शानं देहाबरोबर मन रोमांचित झालं व अवघ्या अस्तित्वावर शिडकावा वासनेच्या पलीकडे रमणीय प्रणय प्रदेशात घेऊन त्यांना गेला.
विवाहापूर्वी एकदा दोघांनी नागपंचमीच्या आदल्या रात्री एकमेकांना मेंदी काढली, तेव्हा त्यांच्या हातावरील मेंदी जास्त रंगली होती. कारण तिचं तर्कशास्त्र होतं, ‘ज्यानं काढलेली मेंदी जास्त रंगते, त्याचं प्रेम अधिक असतं.’ तिच्या प्रेमाला तर तोड नव्हतीच, पण चळवळ व वैचारिक लेखनात रमणारे साळुंकेंचंही पत्नीप्रेम तेवढंच उत्कट होतं. पुढे विवाहानंतर त्यांचा मेंदी काढायचा हा सिलसिला कायम राहिला. जणू काही मेंदी हा दोघांना एकत्र आणणारा मजबूत दुवा होता त्यांच्या पत्नीच्या लेखी. आज तिच्या माघारी त्यांना वाटतं की, पत्नीच्या हातानं मेंदी कायमची गोंदवून घ्यायला हवी होती - सर, तुम्ही केवळ प्रेमच केलं नाही तर प्रेम जगलात!
No comments:
Post a Comment