Sunday, December 26, 2010

आ.ह.साळुंखे लिखित "शिवराय:संस्कार आणि शिक्षण" ( परमानंदकृत शिवभारताच्या आधारे ) प्रकाशित

आ.ह.साळुंखे लिखित "शिवराय:संस्कार आणि शिक्षण" ( परमानंदकृत शिवभारताच्या आधारे ) प्रकाशित
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिलेले परमानंदकृत "शिवभारत" ह्या अस्सल साधनाच्या आधारे शिवरायांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यावर जिजाऊ आणि शहाजीराजे ह्यांच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा प्रभाव त्यांना छत्रपती पदापर्यंत घेवून गेला.. साळुंखे सरांनी ह्याचा धावता आढावा शिवभारताच्या आधारे घेतला आहे... आ.ह.साळुंखे ह्यांचे हे शिवचरित्रावरील पहिलेच पुस्तक असल्याने चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आणि अपेक्षा आहेत..

Dr.A.H.Salunkhe's Shivray: Sanskar Ani Shikshan Published...

Wednesday, October 27, 2010

धर्मवाद आणि जमातवादांचे मराठी साहित्यात उमटलेले पडसाद : एक चिंतन

धर्मवाद आणि जमातवादांचे मराठी साहित्यात उमटलेले पडसाद : एक चिंतन
-
Wednesday, April 14, 2010 AT 05:00 AM (IST)

धर्म, अर्थ, संस्कृती, राजकारण इ. क्षेत्रातील अनुभव व आकांक्षाचा अविष्कार म्हणजे साहित्य व्यवहार असतो. अशा या साहित्य व्यवहारात धर्मबाद आणि जमातवादाचे पडसाद उमटले की नाही त्यापेक्षा ते कशा पद्धतीने उमटले याची चर्चा करणे अधिक अर्थपूर्ण ठरेल.
चर्चेतील ठळक बाबी
1) रुढ अर्थाने येणाऱ्या धार्मिक वाङ्‌मयाची यात चर्चा नसून धर्मबाद व जामतवादाने व्यापलेल्या मानवी जीवनाचे मराठी साहित्य कसे पडसाद उमटले ? 2) धर्माचा मानवी जीवनातील सामाजिक नैतिकतेचा भाग म्हणून कधी माणसांच्या आदीम प्रेरणांच्या स्वरुपात, कधी समाजधारणेचे ऐहिक तत्त्व म्हणून, कधी व्यवस्था परिवर्तनाची क्रांतीकारी आणि मुक्तीदायी भूमिका तर कधी दमन-शोषणाची क्रूर यंत्रणा म्हणून होणाऱ्या वैचीत्र्यपूर्ण स्थितीचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटले ? 3) सामाजिक शास्त्राचा अभ्यासक आणि सृजनशील साहित्यिक या दोन्हीची साहित्याकडे पाहणी दृष्टी भिन्न असे. कारण मानवी भाव-भावनांच्या द्वंद्ववाचा वेध उदा. प्रेम-क्रौर्य, आशा-निराशा, स्वप्नांची मोहकता-वास्तवांची दाहकता अशा विविध घटनांचा वेध सृजनशील साहित्यिक घेत असतो. तर अभ्यासकाने केलेली चिकित्सा ही त्या साहित्य कृतीच्या मूल्यांच्या संदर्भात केलेले भाष्य असते. समाजचिकित्सेत समाजदर्शन घडविणे हे या भाष्यामागचे प्रयोजन लक्षात ठेवून ही चर्चा केली आहे. 4) एकूण साहित्यप्रवाहात धर्म किंवा जमातवाद विषयक विश्लेषणात राहून गेलेल्या उणिवा व आगामी साहित्यविश्र्वाकडून असणाऱ्या अपेक्षा हा या चर्चेचा समारोप आहे.
धर्म आणि साहित्य यांचा सहसंबंध
धर्म आणि मराठी साहित्याचे नाते बहुआयामी आणि व्यामिश्र आहे. 19 व्या शतकात ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात जी प्रबोधनाची पिढी अवतरली तिने धर्म आणि साहित्य यांच्या परंपरागत नात्यात अमूलाग्र बदल घडवून आणला.
चांगल्या साहित्याचे प्रयोजन म्हणजे धर्मजागृती, धर्मशिक्षण ही पारंपारिक मानसिकात झुगारुन धर्माशिवाय साहित्याची अन्य प्रयोजनही असू शकतात हा नवा विचार मांडला. साहजिकच या नव्या प्रबोधनकारी विचाराने धर्म आणि साहित्याची एकरुपता भंग पावली.
प्रबोधनकालिन धर्मचिकित्सेने साहित्य प्रेरित झाले तर तात्कालिन साहित्याने धर्मविषयक विचार अधिक समृद्ध केला. ईश्र्वर परायणता, धार्मिकता, नैतिकता यांचा परस्परसंबंध व धर्म ही दैवी संस्था की ऐतिहासिक घटना अशा प्रश्नांच्या साधक-बाधक चर्चेतून मराठी साहित्याने प्रचंड गद्यनिर्मिती केली. धर्मशास्त्र व धर्मपंडितापुरता असलेल्या धर्मचिकित्सेचा अधिकार 19 व्या शतकातील प्रबोधनाने अधिक सार्वत्रिक बनवला.
प्रबोधनकारी पिढीने धर्माचा मोक्षदायी आशय गौण ठरवून मुक्तीदायी व मानवनिष्ठ आशय अधोरेखित केला. धर्म, जात, प्रथांच्या नावावर होणारी घुसमट शोषण यावर प्रकाश टाकणारे वैचारिक नाटके, कथा, कादंबऱ्या इ. साहित्य निर्माण होऊ लागले.
विष्णुबुवा ब्रह्मचारीचे "समुद्रकिनारीचे वाद-विवाद' न्या. रानड्यांची "धर्मपर व्याख्याने', ह.ना. आपट्यांच्या सामाजिक आशय सांगणाऱ्या कादंबऱ्या. श्री.ना.पेंडसेची वर्णसंस्कार भाष्य करणारी "गारंबीचा बापू', श्रीधर व्यंकटेश केतकरांची "ब्राह्मणकन्या' "तृतीय रत्न' पासून "सार्वजनिक सत्यधर्म' पर्यंतचा म. फुले यांचा ब्राह्मण वादाची परखड चिकित्सा करणारा साहित्यप्रवास, स्त्रीयांची आत्मचरित्रे व स्मृतीचित्रे हे सर्व 19 व्या शतकातील धर्मचिकित्सेतून येणाऱ्या जीवनमूल्यांची चर्चा करताना दिसतात.
धर्माचे साहित्यातील बदलते अविष्कार
धर्माच्या बदलत्या अविष्कारांचे प्रतिबिंब समकालीन साहित्यात पडत असते. 19 व्या शतकातील धर्माचे विवेकनिष्ठ स्वरुप 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात हिंदू-मुस्लिम जमातवादाच्या दंगलीमुळे निस्पृतीत गेले.
राज्यकर्त्यांची भेदनिती, दमननिती, शीख, मुस्लिम व ब्राह्मणेत्तर समूहांना वेगळी ओळख देणारे सुधारणा कायदे, याचा परिणाम धर्म मूलत: एका बाजूला जमातवाद तर दुसऱ्या बाजूला राष्ट्र वादाच्या रुपात अवतरु लागला.
साधर्म्यापेक्षा वेगळेपणा अधोरेखित करणाऱ्या संप्रदाय भावनेमुळे दुसऱ्या जमातीचा माणूस नुसता परकाच नाही तर संशयास्पद वाटू लागला. यातूनच धार्मिक जमातवादाची प्रक्रिया सुरु झाली. जमातवादी धर्माचे खोलवर विश्लेषण करणारे प्रत्ययकारी वर्णन तत्कालीन मराठी साहित्यात आभावनेच आढळते. उलट या जमातवादी दृष्टीचाच अविष्कार सावरकरांच्या अंदमानोत्तर साहित्यात नाटक कादंबऱ्या इत्यादीतून प्रतिबिंबीत होतो. पुढे मुसलमान हा व्हीलन, बलात्कारी किंवा दृष्ट असल्याने चित्रीत होणे हा निव्वळ योगायोग नसतो तर जमातवादी दृष्टीचा तो साहित्यिक अविष्कार असतो.
फाळणीच्या आघाताने व दंगलीने जमातवादी दृष्टी अधिक गडद झाली तर 1956 च्या डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हिंदू समाजाला आणखी एक हादरा बसला आणि मुस्लिम विरोधाबरोबरच दलित विरोधाचा उघड आयाम हिंदू जमातवादास प्राप्त झाला. पण र.वा.दिघे, हमी दलवाई यासारख्या चार दोन साहित्यीकांचा अपवाद वगळता फाळणी, दंगली किंवा जमातवादास नाटक-कादंबरीचा विषय बनवण्याबाबत अनेक साहित्यिक उदासिनच राहिले.
1990 च्या दशकात मात्र जेंव्हा मराठी साहित्य चळवळीचे व्यासपीठ कार्यरत झाले तेंव्हा जावेद कुरेशी, एहत मामू देशमुख, मुबारक शेख, फ.म. शहाजिंदे, डॉ. अझीज नवाब, इलाही जमादार, फक्रूदीन बेन्नूर या मुस्लिम मराठी साहित्यिकांनी मुस्लिमांच्या एकांगी चित्रणाबाबत आवाज उठवला.
मुस्लिमांप्रमाणेच ख्रिस्ती, जैन, बौद्ध, मराठी लेखकांनी आपापल्या साहित्यकृतीतून धार्मिक प्रश्न मांडला. 1980 च्या नंतर त्या-त्या धर्मांतर्गत जगण्याचे प्रश्न, हिंद्ववेत्तर धर्मातील जातीग्रस्त अवस्था, त्यांच्यावरील पारंपारिक हिंदू संस्कृती व कर्मकांडाच्या प्रभावामुळे "घरका ना घाट का' अशी निर्माण झालेली त्रिशंकू अवस्था विविध धर्मीय समाजाअंतर्गत लिंगभेदभावात्मक शोषणाचे प्रश्न, धार्मिक अल्पसंख्य म्हणून वाट्याला येणारी उपेक्षा व असुरक्षा यातून अपरिहार्यपणे धर्मवाद, जमातवाद व मुलतत्ववादाकडे नेणारा परतीचा प्रवास यांचे चित्रण या समूहांनी केले आहे.
जातीग्रस्त जीवनाच्या प्रश्नांना पहिल्यांदा वाचा फोडली ती डॉ. आंबेडकरांनी, दलितांप्रमाणेच वर्णव्यवस्थेने अलग ठेवलेल्या आदिवासी भटके विमुक्त या जमातीतूनही विद्रोही साहित्य निर्माण झाले. कॉ. शरद पाटील यांनी प्राचीन ते अर्वाचीन काळापर्यंत केलेली भारतीय इतिहासाची पूनर्मांडणी किंवा डॉ.आ.ह. साळुंखे यांनी धर्म व संस्कृतीची केलेली चिकित्सा मराठी साहित्याला वेगळे वहण देणारी आहे.
डॉ. रावसाहेब कसबे, गो.नी. दांडेकर, श्री.ना. पेंडसे, खानोलकर, रंगनाथ पाठारे, राजन गवस, आनंद यादव यांच्या साहित्यातील ग्रामीण जीवनदर्शन विशेष उल्लेखनीय आहे.
स्त्रीवादी धर्मचिकित्सा
भारतात प्लेबीया ऍग्नीस, झोया हसन, रझीया पटेल, तिस्ता सेटलबाड, लतिका सरकार इत्यादींनी विविध धर्मीयांच्या कायद्याच्या अनुषंगाने धर्माचा विचार केला तरी सर्वांगिण मुक्तीदायी धर्मशास्त्र मांडण्याचे प्रयत्न अद्याप सुरु झालेले नाहीत. धर्मग्रस्ततेमुळे निर्माण होणाऱ्या घटस्पोटित विधवा, परित्यकता, बहुपत्नीकत्व आदी प्रश्नांची चर्चा स्त्रीवादी विश्र्वात असली तरी त्याचे फारच थोडे पडसाद मराठी साहित्यात उमटले आहेत.
दलित स्त्री-पुरुष साहित्यिकांनी, मुरळी, देवदासी, जोगीनी हे प्रश्न प्रकर्षाने मांडले. लैंगिक व सांस्कृतिक शोषणाला मान्यता देणाऱ्या धर्मव्यवस्थेचे प्रत्यकारी चित्रण बाबुराव बागुलांच्या "सुड'सारख्या दिर्घकक्षेत येऊन जाते तर अर्थव्यवस्थेने जन्मास घातलेल्या देवदासी, जोगत्या या शोषण यंत्रणेचे दाहक वर्णन राजन गवस यांच्या "भंडारभोग' या कादंबरीतून येते. वर्णसंकरातून जन्म झाल्यावरची अधातरी अवस्था शरणकुमार लिंबाळे यांच्या "अक्करमाशी' या साहित्यकृतीतून तर सगळेच वडार किंवा पारधी चोर नसतात पण जातीच्या शिक्क्यामुळे होणारी घुमसट लक्ष्मण गायकवाडाच्या "उचल्या' या आत्मचरित्रातून प्रकट होते. याच पद्धतीने डॉ. किशोर काळे यांचे "कोल्हाट्याचं पोरं' किंवा हंसा वाडकरांची "सांगत्ये ऐका' अलिकडच्या काळातील स्वलिखित "शापीत पैंजण' सारखा काव्यसंग्रह यातून पुरुषप्रधान संस्कृतिक पाठिंबा देणाऱ्या धर्मव्यवस्थेतील समीक्षा संबंधितांनी केली. पण त्या तुलनेत सानीया, मेघना पेठे, गौरी देशपांडे, प्रिया तेंडूलकर यांनी फक्त भांडवलशाही व्यवस्थेतील स्त्रीचे होणारे वस्तूकरण व परात्मीकरण याचीच चर्चा आपल्या साहित्यात केली आहे. एका बाजूला धर्मग्रस्त स्त्रीयांच्या खोल जाण व त्याबद्दलची सूचक मांडणी दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे यांच्या ललित लेखनात तर दुसरीकडे ती अरुणा ढेरे यांच्या "भगव्या वाटा' किंवा "कृष्ण किनारा' या सारख्या पुस्तकातून स्त्रीसंतांच्या स्त्रीत्वाची घेतलेली दखल म्हणजे समर्थ स्त्री जीवनाचा ठाव असे म्हणता येईल. इरावती कर्वे यांच्या परीपूर्ती सारख्या लेखनातून ख्रिस्ती धर्म ग्रस्त स्त्रीयांचे भावविश्र्व किंवा हिंदू-ख्रिस्ती स्त्रीचे मनोधारणा सुचकतेने लक्षात घ्यावी.
निष्कर्ष
1) दलित साहित्याने जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वावर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर चिकित्सा किंवा समीक्षा केली व ती आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटके यासारख्या साहित्यकृतीतून मांडली तशी चिकित्सा ग्रामीण व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. 2) "रात्र काळी घागर काळी' किंवा "चानी' सारख्या खानोलकरांच्या साहित्यकृतीतून आदीम प्रेरणांच्या रुपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपारिक भक्तीसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलिकडे ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले दिसत नाही. 3) दलित स्त्री-पुरुष साहित्यिकांनी मिळून धर्मग्रस्त समाज व्यवस्था व धर्मगग्रस्त स्त्रियांचे प्रश्न मांडले मात्र मुस्लिम मराठी साहित्यातील तलाकपीडितांचे किंवा बहुपत्नीकत्वाचे प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले. ते ही अत्यंत तुरळक व स्फूट आहे. 4) मराठी वैचारिक साहित्यात धर्म आणि संस्कृती यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. वि.रा. शिंदे, सानेगुरुजी, लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य विनोबा भावे यांचे संस्कृती चिंतन म्हणजे धर्म चिकित्साच आहे. अगदी अलिकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "सदानंद मोरेंनी' केलेले भाष्य किंवा दिलीप चित्रे यांनी "तुकोबाच्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन मराठी संस्कृतीविषय चर्चाविश्र्वाचा एक समृद्ध धर्मचिंतनाचा भाग आहे. मात्र त्याचा मागमूसही मराठी कथा कादंबऱ्यातून दिसून येत नाही.
-
प्रा. सुषमा अंधारे
राज्यशास्त्र विभाग,
आ. ह. साळुंखे यांना दुदुस्कर पुरस्कार प्रदान
सातारा, २ सप्टेंबर/प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या शिक्षणसम्राटांच्या विकासामुळे शिक्षणाचे बाजारीकरण वाढले असून, बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात आले आहे. ही चिंतेची बाब असल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनी व्यक्त केली.
येथील सातारा मराठा विद्या प्रसारक समाज व कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक राबहादूर दुदुस्कर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा या वर्षीचा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शरदराव चव्हाण, उपाध्यक्ष अ‍ॅड. संभाजीराव नलावडे, सचिव प्रश्न. रामचंद्र जाधव, प्रश्नचार्य डॉ. यशवंत पाटणे व मृणालिनी दुदुस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
अ‍ॅड. गोविंद पानसरे म्हणाले की, थोर शिक्षण महर्षीची परंपरा मोडीत काढून शिक्षणसम्राटांनी त्याचा धंदा मांडून शिक्षणाची विक्री सुरू केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर या शिक्षणसम्राटांचे नाव घेतले जाते हे खेदजनक आहे. वाईटाला वाईट म्हणायला कचरता कामा नये. कृतीविना विचार, तत्त्वज्ञान शून्य आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सत्कार हा त्यांच्या विचारांचा सत्कार आहे. समाजात अशा माणसांचे सत्कार दुर्मिळ झाले असून, नको त्या विचारशून्य व्यक्तींचा सत्काराचे स्तोम फोफावले आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, गौतम बुद्ध, राजर्षी शाहूमहाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, म. फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा जोपासणे व ती कृतीत आणणे गरजेचे आहे. कोणत्याही महापुरुषांचे विचार चिकित्सकपणे तपासून मगच ते स्वीकारावेत. माझे लेखनही डोळसपणे तपासले तर मला अधिक आनंद वाटेल. गौतम बुद्धाकडे एक समाजचिंतक म्हणून पाहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

डॉ. आ ह साळुंखे सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी आढावा सदस्यपदी..



समाजवाद मूठभर लोकांच्या ताब्यात
-
Monday, July 19, 2010 AT 12:00 AM (IST)

सातारा - समाजवाद मूठभर लोकांच्या ताब्यात असून, भांडवलदारांचे वर्चस्व कमी झाल्याशिवाय समाजवाद अस्तित्वात येणार नाही. सगळ्यांचे कल्याण म्हणजे समाजवाद असा सूर विविध मान्यवरांच्या समाजवाद ते नक्षलवाद या महाचर्चेतून निघाला.

राज्य कामगार सुरक्षा दल, प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी यांच्यातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त आयोजित समाजवाद ते नक्षलवाद या महाचर्चेत पद्मश्री लक्ष्मण माने, सरचिटणीस प्रवीण बाराथे यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊंचे सहकारी प्रा. रतनलाल सोनाग्रा होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे, कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांची प्रमुख उपस्थिती होती.
लक्ष्मण माने म्हणाले, ""कोणाच्या मालकीचे काहीही नाही म्हणजे साम्यवाद, तुमचे श्रम विकत घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे तो भांडवलदार. उत्पादन साधनाची मालकी कोणाची यावर समाजवाद अवलंबून आहे. आज मूठभर लोकांच्या हातात समाजवाद अडकला आहे. ज्या लोकशाहीचे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले ती आपल्या हातून कधीच निघून गेली आहे. सत्ता, संपत्ती, समाजवाद येईल असे वाटत होते ते सर्व मार्ग बंद झाले आहेत. श्रीमंत गरिबांतील अंतर वाढत आहे. यामुळे पुढील काळात जाती जातीत फूट पाडण्याचे प्रकार होणार नाहीत. लोकशाही पद्धतीने सत्ता, संपत्ती व समाजवाद वाटला जाईल. त्यासाठी नक्षलवाद उपयोगाचा नाही. नक्षलवादी आपले मित्र आहेत; पण त्यांनी विचाराला विचारांनी मारले पाहिजे.''

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, ""अण्णा भाऊ साठेंनी विलक्षण प्रतिभेच्या जोरावर समाजातील लोकांच्या दु:खाला वाचा फोडणारे वाङ्‌मय निर्माण केले. चिमणीला ज्याप्रमाणे चिवचिवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.''

प्रवीण बाराथे म्हणाले, ""समाजवादाची व्याप्ती मोठी आहे. साम्यवादाची पहिली पायरी समाजवाद होय. आपल्याकडील काही राज्यात नक्षलवाद सुरू झाला. नक्षलवाद ही साम्यवादी चळवळीचा जहाल गट आहे. जाती व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत समाजवाद या देशात येऊ शकत नाही.''

अध्यक्षस्थानावरून रतनलाल सोनाग्रा म्हणाले, ""समाजवादी लढे बौद्धिक होते. व्यवस्था बदलायला हवी होती ती बदललेली नाही. अण्णा भाऊंनी नव्या विचाराचा समाजवाद आणण्याचा विचार दिला.''

या वेळी अमर गायकवाड, कुंडलिक पाटोळे, विजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांचा कामगार सुरक्षा दल व दलित विकास आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास हरिभाऊ वाघमारे, विजयराव गायकवाड, प्रल्हाद साठे, वसंतराव बडेकर, सुनील आवळे, जगन्नाथ फाळके, लालासाहेब खुडे, संजय भोसले, मनोज घाडगे, गोपाळराव साठे, हनुमंत गायकवाड, रवींद्र खुडे, नाना आवळे, संतोष गायकवाड, साईनाथ खंडागळे, संतोष पवार, बाबासाहेब बोबाटे, अशोक बोबाटे आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

अनेक विषयांच्या अभ्यासामुळे वेगळी दृष्टी मिळते : डॉ. साळुंखे
ऐक्य समूह
Sunday, September 19, 2010 AT 01:15 AM (IST)
Tags: news
सातारा, दि.18 : जगभर अध्ययनाची ताकद विस्तारत आहे. अशावेळी केवळ एकाच विषयाचा अभ्यास करुन चालणार नाही तर अनेक विषयांचा अभ्यास असणे केव्हाही चांगले. यामुळे वेेगळी दृष्टी प्राप्त होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
येथील अनंत इंग्लिश स्कूलमधील विज्ञान शिक्षक विलास सोनावणे यांनी लिहिलेल्या व लोकायत प्रकाशन, सातारा यांनी प्रकाशित केलेल्या रयतेचा राजा या पुस्तकाचे प्रकाशन शाळेमध्ये मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह चं. ने. शहा, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी गोंधळी, शालाप्रमुख शहाजीराव देशमुख उपस्थित होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, आज जग विस्तारत असल्याने केवळ एकच विषय धरुन चालणार नाही. लेखक जरी विज्ञान विषयाचे शिक्षक असले तरी त्यामुळे त्यांच्या लेखनाला वैज्ञानिक दृष्टी लाभली आहे. विज्ञानाचे शिक्षक मानव्यशास्त्र विषयात चांगले लेखन करू शकतील, असे मत व्यक्त करुन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात शाळेमधील शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पुस्तकाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे उपशालाप्रमुख शिवाजी राऊत यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत पुस्तकाचे विश्लेषण केले. ते म्हणाले, इतिहासाचे मूलगामी लेखन करायला ताकद असायला लागते. त्यातून युगपुरुष असणाऱ्या छत्रपतींबद्दल लेखन करताना खूप अवधानं बाळगावी लागतात. पण सोनावणे यांनी एकूण 57 संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करुन रयतेचा राजा हे पुस्तक सिध्द केले आहे.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, सोनावणे यांनी अतिशय संयम बाळगून या पुस्तकाचे लेखन केले आहे. यात कोणावरही अवास्तव टीका केलेली नाही किंवा छत्रपतींच्या जीवनातील कोणत्याही चमत्काराला स्थान दिले नाही, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
शिक्षण अधिकारी गोंधळी म्हणाले, हे केवळ इतिहासाचे पुस्तक आहे असे समजता कामा नये तर त्यापासून
प्रेरणा घेवून शालेय उपक्रमात याचा कशा प्रकारे उपयोग करुन घेता येईल, याचा विचार केला पाहिजे.
विलास सोनावणे यांनी लेखनामागील आपली भूमिका स्पष्ट केली. ते
म्हणाले, छत्रपतींच्या जीवनाचा मागोवा घेण्यासाठी शिवभारत हे काव्य शिवकालाचा अस्सल पुरावा आहे. छत्रपतींनी जरी स्वराज्याची स्थापना केली असली तरी त्याआधीपासून त्याचा विचार शहाजीराजे आणि जिजामाता यांचा सुरू होता. छत्रपतींनी कायम रयतेचा विचार केला म्हणूनच रयतेची त्यांच्यावर निष्ठा होती.
कार्यवाह शहा यांनीही पुस्तक लेखनाबद्दल सोनावणे यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. शाळेचे शिक्षक शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शालाप्रमुख शहाजीराव देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक व मान्यवर उपस्थित होते.

Monday, August 9, 2010

डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव

डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव
इंगोले, दौंड, घोडेगावकर, यशवंत, अंत्रेंना विखे पाटील साहित्य पुरस्कार जाहीरराहाता,
५ ऑगस्ट/वार्ताहरसहकारी
साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना देण्यात येणार आहे. अन्य साहित्य पुरस्कारही आज जाहीर करण्यात आले, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक प्रा. शंकरराव दिघे यांनी दिली.पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्काराचे हे विसावे वर्ष आहे. यावर्षी लेखिका प्रतिमा इंगोले यांच्या आत्मघाताचे दशक या साहित्यकृतीस, लोकनाथ यशवंत यांच्या पुन्हा चाल करू या..! या काव्यसंग्रहास, जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार कैलास दौंड (पाथर्डी) यांच्या कापूस काळ कादंबरीस, कला गौरव पुरस्कार वगनाटय़ लेखक नाथामास्तर घोडेगावकर यांना, तर विखे पाटील विशेष साहित्य पुरस्कार पत्रकार विकास अंत्रे यांच्या झेंडूची फुले या कथासंग्रहास देण्यात येणार आहे. दि. २४ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.श्री. साळुंखे यांच्या देण्यात येणाऱ्या विखे पाटील साहित्य जीवनगौरव पुरस्काराचे ५१ हजार रूपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. इंगोले यांना २५ हजार, यशवंत यांना १५ हजार, दौंड व घोडेगावकर यांना प्रत्येकी १० हजार व अंत्रे यांना ५ हजार, तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.श्री. साळुंखे यांनी केलेले चिंतन व ग्रंथलेखन हे महाराष्ट्राचे वैचारिक श्रेष्ठत्व सिद्ध करणारे आहे. सामाजिक परिवर्तनात बाधा बनलेल्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहासाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण करीत त्यांनी निर्भिडपणे विविध ग्रंथांतून विचार मांडले आहेत. त्यांचे सर्व साहित्य महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा मार्गदर्शक ग्रंथ ठरले आहे. धर्म आणि संस्कृतीच्या नावे सामान्य माणसाचे होत असलेले शोषण त्यांनी साहित्यातून मांडले आहे.इंगोले यांनी विदर्भातील सहा जिल्ह्य़ांत फिरून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबास भेट दिली. त्यांच्या समस्या व शेतकरी जीवन त्यांनी आत्महत्येचे दशक या साहित्यकृतीत मांडले आहे. यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. कापूस काळद्वारे दौंड यांनी एका पिकाभोवती शेतकऱ्यांचे जीवन कसे फिरते याचे चित्रण केले आहे.सर्वश्री. रावसाहेब कसबे (अध्यक्ष), डॉ. गोपाळराव मिरीकर, प्राचार्य विजयराव कसबेकर, प्रा. मेधा काळे, प्रा. शंकरराव दिघे (निमंत्रक) व डॉ. राजेंद्र सलालकर यांच्या निवड समितीने वरील पुरस्कारासाठी साहित्यकृतींचे परीक्षण केले.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना 'पद्मश्री विखे-पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार' जाहीर
साहित्य सृष्टीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना दिला जाणारा यावर्षीचा 'पद्मश्री विखे-पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर झाला आहे. ५१ हजार रु. रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २४ ऑगस्टला पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
डॉ. साळुंखे यांच्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नावर आधारित असलेल्या 'आत्मघाताचे दशक' या प्रतिमा इंगोले यांच्या साहित्यकृतीस व लोकनाथ यशवंत यांच्या 'पुन्हा चाल करू या...' या काव्यसंग्रहाला विखे-पाटील साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पाथडीर्चे पत्रकार कैलास दौंड यांच्या 'कापूस काळ' कादंबरीला नगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, तर विकास अंत्रे यांच्या कथासंग्रहाला विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. प्रवरानगर येथे डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत

Dr.A.H.Salunkhe Awarded By Chhatrapati Shahu Award

डॉ. आ. ह. साळुंखे यांचा शनिवारी गौरव समारंभ

आकाशवाणीवर आज मुलाखत

सातारा, ७ जुलै/प्रतिनिधीज्येष्ठ विचारवंत, राज्य मराठी धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विद्यार्थ्यांनी येत्या शनिवारी त्यांचा गौरव समारंभ आयोजित केला आहे. गुरुवारी व शुक्रवारी सातारा आकाशवाणीवर त्यांची प्रदीर्घ मुलाखत होणार आहे.प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गेली वीस वर्षे संशोधनातून व वैचारिक लेखनातून अनेक मौल्यवान ग्रंथांची निर्मिती केली आहे. आपल्या या गुरुच्या कर्तृत्वाचा गौरव करावा आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या विद्येच्या ऋणाचे स्मरण करावे, या उद्देशाने प्रा. डॉ. साळुंखे यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऋण- स्मरण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सातारा येथे केले आहे.कै. श्री. घ. प्रतापसिंहमहाराज (थोरले) नगरवाचनालय, सातारा येथे प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सत्कार त्यांचेच एक विद्यार्थी आणि सध्या सैनिक स्कूल सातारा येथे अध्यापनाचे काम करीत असलेल्या किशोर रसाळ यांच्या हस्ते होणार आहे.ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना कोल्हापूर येथे नुकतेच ‘शाहू पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे यांनी काम पाहिले आहे. राजभाषा मराठी धोरण सल्लागार समितीवरही प्रा. डॉ. साळुंखे यांची नुकतीच निवड झाली आहे. परिवर्तनवादी समतावादी अनेक संघटना, कार्यकर्त्यांना प्रा. डॉ. साळुंखे मार्गदर्शन करतात. या कर्तृत्वाचाच गौरव ऋण स्मरणाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.आज व उद्या सातारा आकाशवाणीवर मुलाखतप्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांची सातारा आकाशवाणीवरून गुरुवारी (दि. ८) व शुक्रवारी (दि. ९) सकाळी ९.३० वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत किशोर बेडकीहाळ, प्रा. डॉ. शरद गायकवाड व डॉ. गीतांजली पोळ यांनी घेतली आहे.

तरुणाईने शाहूंचे विचार समजून घ्यावेत - डॉ. आ. ह. साळुंखे
-
Sunday, June 27, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags:
western maharashtra, kolhapur, youth, shahu maharaj
कोल्हापूर - "राजर्षी शाहूंनी दाखविलेल्या मार्गावरून केवळ दोन पावलं चाललो तर माझा इतका सन्मान झाला. तरुणाईने शाहू विचार समजून घेऊन वाटचाल केली तर आपलाही किती सन्मान होईल, हे आता तरी समजून घ्यावे. कोल्हापूर हे माझे दुसरे हृदय असून राजर्षी मला जणू कवटाळून कौतुक करत आहेत,'' अशा शब्दांत आज ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी भावना व्यक्त केल्या.येथील राजर्षी शाहू मेमोरिअल ट्रस्टतर्फे डॉ. साळुंखे यांना ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या हस्ते आज शाहू पुरस्काराने सन्मानित केले. एक लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तुडुंब भरलेल्या शाहूप्रेमींच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवनात दिमाखदार सोहळा झाला. आर्थिक महासत्तेचे स्वप्न घेऊन सध्या वाटचाल सुरू असली तरी राजर्षींनी केलेल्या कार्याच्या जोरावरच आज आपण हे स्वप्न पाहू शकतो; मात्र विज्ञानातील प्रगतीबरोबरच सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावण्यात अयशस्वी ठरलो तर हे स्वप्न अपूर्ण ठरेल, असा संदेश यानिमित्ताने झालेल्या वैचारिक मंथनातून
मिळाला.विज्ञाननिष्ठा, जागतिकीकरण, सामाजिक चळवळींची सद्यःस्थिती अशा विविध अंगांनी डॉ. साळुंखे यांनी संवाद अधिक खुलवला.ते म्हणाले, ""विज्ञानाशिवाय प्रगती अटळ असली तरी त्यावर विवेकाचा अंकुश असावा. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जावेच लागेल. त्यासाठीच्या स्पर्धेत माणूसपण मात्र टिकवावे. चिमणी घरट्यात स्वच्छंदपणे जीवन जगत असेल तर माणूस असं जीवन का जगू शकत नाही, असा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. माणसामाणसांना जोडणारे नवे सेतू आता निर्माण झाले पाहिजेत.''प्राचार्य पी. बी. पाटील म्हणाले, ""धर्म म्हणजे सर्व सजीवांना आधार व प्रेरणादायी ठरणारा, त्यांच्या निर्वाहाच्या व्यवस्थेचा आणि संरक्षणाचा विचार असतो; मात्र खरा धर्म अजूनही माणसाला समजलाच नाही. प्रस्थापितांनी केवळ कर्मकांडात बुडविलेल्या महामानवांचे विचार डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आता पुन्हा रुजविले असून, त्या विचारांची पालखी प्रत्येक पिढीने पुढे नेली तर भारतधर्म खऱ्या अर्थाने विश्‍वधर्म होईल.''माणसाच्या जन्मापासून ते त्याचे संगोपन, शिक्षणव्यवस्था आणि धर्मव्यवस्था अशा सर्वच पातळ्यांवर माणसाची स्वभावसिद्ध जिज्ञासा जाणीवपूर्वक दाबून, भ्रमिष्ट करून, मुरगळून टाकली गेली, असे वास्तव मांडत ब्राह्मणी संस्कृतीवर प्राचार्य पाटील यांनी प्रहार केला. ते म्हणाले, ""माणसाची स्वभावसिद्ध जिज्ञासा जितकी जाज्वल्य आणि प्रखर असते, तितका माणूस मोठा होत असतो; पण इतिहासाचा धांडोळा घेतला तर प्रस्थापित वैचारिक आणि सांस्कृतिक नेतृत्व करणाऱ्यांनी ही जिज्ञासाच मारून टाकण्याचे काम केले. सामान्य माणसाला इहलोकातून परलोकात नेऊन ठेवले. धर्माच्या कितीही व्याख्या केल्या, अर्थ सांगितला, मीमांसा केली तरीही माणसाला खरा धर्म अद्याप समजलेला नाही. डॉ. साळुंखे यांनी मात्र प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता मानवतावादी विचारवंतांना पुन्हा एकदा समाजासमोर आणले आहे. त्यांना दिलेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने शाहू विचारांचा गौरव आहे.''ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्वागत केले. विश्‍वस्त डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ विश्‍वस्त बाबूराव धारवाडे यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार झाले. माजी कुलगुरू प्रा. रा. कृ. कणबरकर यांनी मानपत्राचे वाचन केले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. जयसिंगराव पवार, सुभाष बोरकर, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते. कोल्हापूरच्या मायेला अंतर देणार नाही - साळुंखेकोल्हापूरनं भरभरून प्रेम केलं असल्याचे सांगतानाच डॉ. साळुंखे यांनी त्यांच्या आजवरच्या संघर्षाच्या काळात प्रोत्साहन दिलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, निळू फुले, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्यापासून ते एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, नागनाथअण्णा नायकवडी, प्राचार्य बाबर, रा. कृ. कणबरकर, बाबूराव धारवाडे यांच्यासह असंख्य चाहत्यांचे पाठबळ मिळाल्याचे सांगून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली असून मायेला कधीही अंतर देणार नाही, असे त्यांनी अभिवचन दिले.

डॉ. आ. ह. साळुंखे यांना दिमाखदार सोहळ्यात शाहू पुरस्कार प्रदान

27-06-2010 : 12:02:27)
कोल्हापूर, दि. २६ (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा असणाऱ्या कोल्हापूरने परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र बनावे. त्यासाठी परिवर्तनवादी विचाराची पालखी वाहणारे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही वाटचाल व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत मुंबई, पुणे येथील संस्कृतीपासून दूर राहून शाहूराजांची ही नगरी पुढच्या काळात शाहूंचीच राहील, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू स्मारकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा मानाचा 'शाहू पुरस्कार' वितरण प्रसंगी ते बोलत होते.प्राचार्य पी. बी. पाटील म्हणाले, मुंबई, पुणे शहरांसारखी औद्योगिक संस्कृतीची पावले कोल्हापुरात पडली आहेत, पण ही संस्कृती गोकुळात शिरलेल्या पुतणा मावशीसारखी आहे. गेल्या पाच हजार वर्षांचे सिंहावलोकन होणे गरजेचे असून, या काळात सर्वसामान्य माणसाला यशाच्या शिखरावर जाण्याची उमेद देण्यापेक्षा ती खचण्याचे प्रयत्न झाले आहेत. माणूस जन्माला येताना प्राण्याचे पिल्लू म्हणून येतो. या प्राण्याचा माणूस होण्यासाठी त्याचे संगोपन व शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पाच हजार वर्षांत मानवतावादी विचारवंताना एका विशिष्ट प्रवाहातून बाहेर काढणे गरजेचे होते. त्यातील काही विचारवंताना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी बाहेर काढण्याचे काम केले असून, प्रत्येक विषयात संशोधक अनेक तयार होतात, पण डॉ. आ. ह. साळुंख यांच्यासारखे नेतृत्व तयार होईल का, असा प्रश्नही प्राचार्य पाटील यांनी केला. धर्मव्यवस्थेवर सडकून टीका करताना प्राचार्य पाटील म्हणाले, धर्मव्यवस्थेने मानसिकदृष्ट्या समाजाला भ्रमिष्ट केले असून, शुद्ध मने अशुद्ध करण्याचे काम या व्यवस्थेने केले आहे.पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, राजर्षी शाहूंनी जो मार्ग दाखविला त्यावरून मी दोन पावले टाकली तर इतका प्रेमाचा वर्षाव होतो. आणखीन चार पावले टाकली तर काय होईल हे तरुणांनी ध्यानात घ्यावे. शाहू महाराजांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आहे. या अपार प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नसल्याचे सांगत येथून पाठीमागे कोल्हापूर हे माझे दुसरे घर असे सांगत होतो, पण आता ते माझे घर नसून दुसरे हदय असल्याचे भावनिक वक्तव्यही डॉ. आ. ह. साळुंखे यानंी केले. हा पुरस्कार स्वीकारताना जणू शाहूंनी मला कवेत उचलून घेतल्याचे समाधान मनाला मिळाल्याचे सांगत कोल्हापूरकरांनी दिलेल्या या मायेला कधीही अंतर देणार नसल्याची ग्वाहीही साळुंखे यांनी दिली.शाहूंच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापुरात कधी दुष्काळ पडत नाही. त्याप्रमाणे येथे शाहूंच्या समतेच्या विचाराचा दुष्काळही पडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सुचवत कलाकारांनी तयार केलेली वस्तू व शास्त्रज्ञांनी लावलेले शोध हे समाजातील सामान्य माणसाच्या जीवनात सुखाची पहाट आणणारी असावे. या शोधाचा समाज व्यवस्था सुधारण्यासाठी उपयोग व्हावा. अशी सर्जनशीलता निर्माण करण्याचे काम शाहू महाराजांनी केल्याचे साळुंखे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्वागत केले, तर शाहू मेमोरियल ट्रस्ट सदस्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. आ. ह. साळुंखे यांना देण्यात येणाऱ्या गौरवपत्राचे वाचन करताना रा. कृ. कणबरकर म्हणाले, महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे योगदान मोलाचे असून, बहुजन समाजातील या माणसाने हिदू धर्मग्रंथाच्या अंतरंगात शिरून ते अंतरंग समाजापुढे मांडण्याचे धाडस केले.राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आ. ह. साळुंख यांना प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य बाबूराव धारवाडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू एन. जे. पवार, डॉ. जयसिगराव पवार, ट्रस्टचे सचिव रमेश चव्हाण, सुभाष बोरकर, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपणपुरस्कार वितरण कार्यक्रमाला शाहूप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. शाहू सभागृह खचाखच भरल्याने सभागृहाबाहेर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल अडीच तास उभे राहून शाहूप्रेमींनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.विद्यापीठातून ज्ञानयोगी बनावेतआजच्या शिक्षण प्रणालीवर टीकास्त्र सोडताना प्राचार्य पाटील म्हणाले, विद्यापीठातून ज्ञानयोगी, कर्मयोगी बनावेत अशी अपेक्षा असते, पण विद्यापीठात नुसते निरुपयोगी तयार करण्याचे काम केले जाते.



डॉ. आ. ह. साळुंखे यांना शाहू पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 17, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: shahu award, kolhapur, western maharashtra
कोल्हापूर - रौप्यमहोत्सवी वर्षातील राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ परिवर्तनवादी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो. लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त शनिवारी (ता. 26) सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनात होणाऱ्या शानदार समारंभात पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार वितरणासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, 21 जूनपासून रोज सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये मान्यवरांचे व्याख्यान आयोजिले आहे.यापूर्वी भाई माधवराव बागल, डॉ. शंकरराव खरात, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, न्या. पी. बी. सावंत, कवी कुसुमाग्रज, अभिनेते चंद्रकांत मांडरे, गायिका आशा भोसले, डॉ. बाबा आढाव, शाहीर विशारद पिराजीराव सरनाईक, नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि गेल्या वर्षी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना पुरस्कार प्रदान केल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, विश्‍वस्त बाबूराव धारवाडे, रा. कृ. कणबरकर पत्रकार परिषदेस उपस्थित होते.परिवर्तनवादी विचारवंत म्हणून ख्याती असलेले डॉ. साळुंखे सध्या सातारा येथे वास्तव्यास आहेत. ते मूळचे शिवाजीनगर (ता. तासगाव, जि. सांगली) येथील आहेत. बी. ए.च्या परीक्षेत शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम आणि भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. चार्वाक-दर्शनाचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएचडी घेतली आहे. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात 32 वर्षे संस्कृतचे आणि काही वर्षे मराठीचे अध्यापक म्हणून काम पाहिले आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सातारा केंद्राचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. बेळगाव, लातूर, सोलापूर, सांगली, बीड जिल्ह्यांतील वेगवेगळ्या संमेलनात अधिवेशनात त्यांनी अध्यक्षपदे भूषविली आहेत.भूमिपुत्र गौतम बुद्ध या ग्रंथासह हिंदू संस्कृती आणि स्त्री, धर्म की धर्मापलीकडे?, महात्मा फुले आणि धर्म, विद्रोही तुकाराम, तुकारामांची शेतकरी, तुळशीचे लग्न - एक समीक्षा अशा अनेक ग्रंथांचे लेखन डॉ. साळुंखे यांनी केले आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे यांना प्रतापसिंह स्मृती पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 18, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: dr.A. H. salunkhe, satara, western maharashtra
सातारा - येथील नगरपालिकेतर्फे देण्यात येणारा "छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृती सेवा पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असा या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतापसिंह महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पालिकेच्या सभागृहात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यापूर्वी संभाजीराव पाटणे, लीलाताई क्षीरसागर व पुरुषोत्तम शेठ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. वैशाली महामुने व उपाध्यक्षा सौ. सुजाता राजेमहाडिक यांनी केले आहे. पालिकेतर्फे उद्या (सोमवारी) सकाळी नऊ वाजता गोलबागेतील प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर राजवाडा परिसरातील जुन्या पशुवैद्यकीय दवाखान्यापाठीमागील बाजूस पालिकेने विकसित केलेल्या पार्किंग मैदानाचे उद्‌घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

इंटरनेट ज्ञान चिकित्सेनेच स्वीकारा- डॉ. आ. ह. साळुंखे


लोकसत्ता वृत्तान्त
सातारा, १५ फेब्रुवारी/प्रतिनिधीइंटरनेट ज्ञान स्वयंभू, स्वयंपूर्ण नाही. त्यावरील माहितीचा महाजाल वापरताना त्याची चिकित्सा करूनच स्वीकारावे, असे आवाहन राज्याच्या संस्कृती धोरण समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.सातारा पत्रकार संघ व पुणे येथील डॉ. नानासाहेब परुळेकर चॅरिटी ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. साळुंखे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, उपाध्यक्ष हरिष पाटणे, कार्यशाळेचे समन्वयक ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, ‘शोध मराठीचा’ चे जनक शुभानन गांगल आदी उपस्थित होते.शुभानन गांगल (मुंबई), संतोष देशपांडे (पुणे), प्रभाकर भोसले (पुणे), दीपा देशमुख (पुणे), सुदाम चौरे (मुंबई) आदी मान्यवरांनी या कार्यशाळेत प्रसारमाध्यमातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापराबाबतचे मार्गदर्शन केले. डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाचा आधार घेताना ते म्हणाले की, पत्रकारांसहित सर्वसामान्य नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नव्याने येणाऱ्या साधनांचे स्वागतच केले पाहिजे, पण ते करीत असताना त्यातली अपुरेपणा, त्रुटी ध्यानात घेण्याची गरज आहे. स्पर्धेच्या युगात येथून पुढे हे तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. युनिकोड स्वीकारावे लागेल. मराठीबाबत फार अडचणी व गोंधळ आहे. त्यावर मात करावी लागेल, भाषा लिपीमध्ये देवनागरीला वेगवान करण्याची गरज आहे. राज्याच्या सांस्कृतिक धोरणात याबाबत समिती नेमण्याचा गांभीर्याने विचार करण्याचा प्रस्ताव सूचविण्यात आलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.प्रसारमाध्यमांचे सामथ्र्य प्रचंड आहे. ती फार मोठी ताकद आहे. म्हणूनच त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. उद्याच्या जगाला कोणत्या दिशेने जायचे हे प्रसारमाध्यमांच्या स्वरूपावर अवलंबून आहे. त्यामुळे उपलब्ध होत असणाऱ्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाला पुढे नेले पाहिजे. शोषक समाजव्यवस्थेत बदल घडवून समता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दुबळ्या समाजाने तंत्रज्ञानाचे सामथ्र्य वापरले नाही तर समतेची लढाई जिंकता येणार नाही. त्यासाठी ही साधनसामग्री अत्यंत वेगाने आत्मसात केली पाहिजे. त्यापासून दूर राहणाऱ्यांचा टिकाव लागणार नाही. तोफा आल्यानंतर हत्ती-घोडय़ांचे, सैन्याचे पानीपत झाले हे ध्यानात घेतले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान वापरताना त्यातील धोक्यावर मात करण्याचा विचारही केला पाहिजे असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.संतोष देशपांडे यांनी ‘सोशल नेटवर्किंग’च्या सामाजिक क्रांतीची माहिती दिली. दीपा देशमुख यांनी ‘युनिकोड’, सुदाम चौरे यांनी ‘सायबर क्राईम’बाबत घ्यावयाची खबरदारी यावर तर शुभानन गांगल यांनी शोध मराठीचा प्रयत्न प्राणवायू फॉन्ट येत्या २७ फेब्रुवारीस ‘लाँच’ होत असल्याची माहिती दिली. यमाजी मालकर यांनी कार्यशाळेचा हेतू विषद केला. सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके यांनी स्वागत केले. हरिष पाटणे यांनी सूत्रसंचालन व विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.

Tuesday, February 2, 2010

dr.a.h.salunkhe

महाराष्‍ट्र राज्‍य सांस्‍कृतिक धोरण मसुदा जानेवारी २०१०मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०३.
अग्रक्रम
प्रस्तुत सांस्कृतिक धोरणात अंतर्भूत करण्यात आलेल्या सर्वच बाबी आपापल्या परीने महत्त्वाच्या असल्यामुळे त्यांच्या संदर्भातील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल. तथापि या समग्र धोरणाची अंमलबजावणी योग्य त्या कार्यक्षमतेने करण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक क्षेत्रातील काही मूलभूत बाबींच्या पूर्ततेकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. अशा काही बाबींची नोंद या धोरणाच्या प्रारंभी अग्रक्रम म्हणून करण्यात आली असून शासन त्यांची अंमलबजावणी तत्परतेने करील.१. चार टक्के रक्कम राखीव - सांस्कृतिक क्षेत्रातील योजनांसाठी दरवर्षी अर्थसंकल्पाच्या चार टक्के रक्कम राखून ठेवण्यात येईल. राज्य शासनाच्या आधीपासून कार्यान्वित असलेल्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी आणि या धोरणात नमूद करण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी ही रक्कम उपयोगात आणली जाईल. २. राज्य सांस्कृतिक निधी - अर्थसंकल्पातील तरतुदीच्या जोडीने राज्य शासनाचा स्वतंत्र असा एक 'राज्य सांस्कृतिक निधी' स्थापन करण्यात येईल. हा निधी उभारण्यासाठी शासकीय अर्थसाहाय्याच्या जोडीने लोकसहभागाचेही स्वागत करण्यात येईल. लोकसहभागामुळे लोकांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि त्यांना सांस्कृतिक क्षेत्राला योगदान देण्याची संधी लाभेल. असा निधी उभारण्यासाठी आणि विविध योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी समाजातील विविध घटकांचे सहकार्य घेण्यात येईल. एरव्ही केवळ शासकीय तरतुदींमधून सहजरीत्या राबविता न येणार्‍या योजना/ उपक्रम या निधीतून राबविले जातील.३. सांस्कृतिक संस्था- स्वावलंबनातून विकास - शासकीय अनुदान घेणा-या संस्‍थांनी आपले कार्य आणि विश्‍वसनीयता यांच्‍या जोरावर उत्‍पन्‍नाचे शासकीय अनुदानाखेरीज अन्‍य स्रोत निर्माण करावेत आणि शक्‍य तितके स्‍वावलंबी होऊन आपल्‍या संस्‍थांचा विकास करावा, अशी सूचना संबंधित संस्‍थांना करण्‍यात येईल. ४. भाषाभवन - भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम एकत्रित राबविण्यासाठी मुंबईत 'रंगभवन' येथे 'भाषाभवन' उभारण्यात येईल. राज्य शासनाची भाषा व साहित्य यांच्याशी संबंधित सर्व कार्यालये या 'भाषाभवना'त असतील. शिक्षण, प्रशिक्षण, जतन, संशोधन आदी कार्यांसाठी या भवनात वेगवेगळी दालने व आवश्यक त्या सोयी-सुविधा असतील. ५. भाषा सल्लागार मंडळ - भाषा संचालनालयासाठीचे भाषा सल्लागार मंडळ त्वरित स्थापन करण्यात येईल. मराठी भाषेशी संबंधित अशा अस्तित्वात असलेल्या व प्रस्तावित सर्व शासकीय/निमशासकीय संस्था (राज्य मराठी विकास संस्था, मराठी बोली अकादमी, मराठी प्रमाण भाषा कोश मंडळ, मराठी शब्द व्युत्पत्ती कोश मंडळ, इ. संस्था) यांनाही हे मंडळ सल्‍ला देईल.६. महाराष्ट्र विद्या – प्राच्यविद्या (ओरिएंटॉलॉजी) आणि भारतविद्या (इंडॉलॉजी) यांच्या धर्तीवर ‘महाराष्‍ट्रविद्या’ (महाराष्ट्र स्टडीज) अशी एक ज्ञानशाखा विकसित होत आहे. त्‍यासाठी ‘महाराष्‍ट्र प्रगत अध्‍ययन केंद्र’ या नावाची एक स्वायत्त संस्था स्‍थापन करण्‍यात येईल. या केंद्रात महाराष्‍ट्रविषयक सर्वांगीण अध्ययनाबरोबरच इतर राज्‍यांशी असलेल्‍या महाराष्‍ट्राच्‍या संबंधांचे संशोधन, अध्‍ययन इ. करण्‍याचीही व्‍यवस्‍था असेल. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत याबाबतची कार्यवाही करण्यात येईल. ७. दक्षिण आशिया संशोधन संस्था - गेल्या ५० वर्षांत केंद्र शासनाच्या साहाय्याने अन्य काही राज्यांत प्रगत संशोधन संस्था निर्माण झाल्या असल्या, तरी महाराष्ट्रात अशा संस्था निर्माण झालेल्या नाहीत, हे वास्तव ध्यानात घेऊन दक्षिण आशिया मधील (‘सार्क’ राष्ट्रांचा) विविधांगी अभ्यास करणारी एखादी संस्था महाराष्ट्रात निर्माण करावी, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येईल आणि अशी संस्था स्थापन होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.८. प्रमाण भाषा कोश - मराठीसाठी प्रमाण भाषा कोश नाही. अशा प्रकारचा प्रमाण भाषा कोश तयार करण्यासाठी 'प्रमाण भाषा कोश मंडळ' स्थापन करण्यात येईल. मराठी प्रमाण भाषेच्या समृद्धीसाठी मराठी प्रमाण भाषेमध्ये प्राकृत, संस्कृत इत्यादी भाषांसह मराठी भाषेच्या विविध बोलींतील निवडक शब्दांचाही आवर्जून समावेश करण्यात येईल. याशिवाय भारतातील अन्य भाषांतून आणि विदेशी भाषांतून स्वीकारण्यात आलेले आणि आता मराठीत रुळलेले शब्दही विचारात घेतले जातील. ९. मराठी बोली अकादमी - राज्याच्या वेगवेगळ्या भागांत मराठीच्या विविध बोली बोलल्या जातात. या बोलींचे अध्ययन, अध्यापन, संशोधन, कोशनिर्मिती, साहित्यनिर्मिती तसेच या बोलींतून होणार्‍या कलांच्या सादरीकरणाचे संवर्धन इत्यादींसाठी एक स्वतंत्र ‘मराठी बोली अकादमी’ स्थापन करण्यात येईल. काही बोली या परप्रांतीय वा परकीय भाषांच्या प्रभावातूनही तयार झालेल्या आहेत. अशा बोलींविषयींचे प्रकल्पही या अकादमीमार्फत राबविण्यात येतील. पहिल्या वर्षी अकादमीसाठी रू. दहा कोटी राखून ठेवण्यात येतील. या रकमेच्या व्याजातून अकादमी काम करील. त्याशिवाय आवश्यकतेनुसार आवर्ती खर्चासाठी शासन दरवर्षी काही रक्कम अनुदान देईल. १०. लेखनपद्धती/वाक्प्रयोग-पुनर्विचार - गेल्या ५० वर्षांत भाषिक आणि एकूण सामाजिक परिस्थितीत घडलेले बदल, तसेच माहिती तंत्रज्ञानामुळे विकसित झालेली संपर्कसाधने इत्यादी बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेसाठी वापरल्या जाणार्‍या देवनागरी लिपीच्या लेखनपद्धतीमध्ये काही बदल करणे ही काळाची गरज बनली आहे. हा बदल करताना पूर्वापार मराठी लेखनपद्धतीमधील काळानुरूप स्वीकारार्ह भाग कायम ठेवून मराठी भाषा व्यवहारोपयोगी आणि अधिक समृद्ध करण्याकरिता लेखनपद्धतीचे नियम अधिक तर्कसंगत आणि अधिक लवचिक करण्यात येतील. लेखनपद्धतीच्या संदर्भात जुन्या विचारांचे योग्य भान ठेवून नवीन प्रवाहांचे स्वागत करणारे अभ्यासक/ तज्ज्ञ यांच्या अभ्यासगटामार्फत लेखनपद्धतीचे नवे नियम ठरविण्यात येतील, तसेच, मराठीतील विशिष्ट शब्द, वाक्प्रयोग इत्यादींचा वापर करण्याच्या बाबतीतही पुनर्विचार केला जाईल. या अभ्यासगटापुढे विचारार्थ ठेवण्यात यावयाची काही उदाहरणे परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये देण्यात आली आहेत. ११. केंद्रीय आस्‍थापनांमध्‍ये मराठी अधिकारी – केंद्र शासनाच्‍या महाराष्‍ट्रातील संस्‍था, बँका, तसेच विविध मंडळे/महामंडळे इ. आस्‍थापनांवर हिंदी अधिका-यांप्रमाणेच मराठी अधिकारी नियुक्‍त करण्‍यात यावेत या पदांसाठी तसेच केंद्र शासनाच्‍या आकाशवाणी / दूरदर्शन या प्रसारमाध्‍यमांमधील कार्यक्रमविषयक व वृत्तविषयक पदांसाठी मराठी विषयात पदवी प्राप्‍त केलेले अधिकारी नियुक्‍त केले जावेत, यासाठी केंद्र शासनाकडे आग्रह धरण्‍यात येईल आणि त्‍यासाठी आवश्‍यक ते प्रयत्‍न करण्‍यात येतील.१२. कलासंकुल - प्रयोगात्म व दृश्यात्मक कलांच्या संवर्धनासाठी विभागीय पातळीवर प्रत्येक महसुली विभागात 'कलासंकुल' उभारण्यात येईल. या संकुलांमध्ये नाटक, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रकला, लोककला, आदिवासी लोककला, हस्तकला इत्यादींसाठी प्रशिक्षण, तालीम आणि सादरीकरण इ. साठी सोयी असतील. या सोयी भाडेतत्त्वावर कलाकार आणि सांस्कृतिक संस्था यांना उपलब्ध असतील. अशी संकुले उभारण्यासाठी शासन प्रत्येक विभागीय महसूल आयुक्तालयाला निधी उपलब्ध करून देईल.१३. खुले नाट्यगृह - प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह (ऍम्फी थिएटर) आणि जिल्हा पातळीवर एक छोटेखानी, सुमारे ३५० ते ५०० आसनक्षमतेचे नाट्यगृह खाजगी सहभागाने बांधण्यात येईल. ते मुख्यत्वे सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरले जाईल.१४. शास्‍त्रीय संगीतासाठी प्रोत्‍साहन योजना - मराठी रंगभूमी आणि लोककला यांच्‍यासाठी राज्‍य शासनाने अलिकडेच दोन स्वतंत्र प्रोत्‍साहन योजना (पॅकेज) जाहीर केल्या आहेत. त्‍याच धर्तीवर शास्‍त्रीय संगीतासाठी अनेक उपक्रमांचा समावेश असलेली शास्त्रीय संगीत प्रोत्‍साहन योजना अमलात आणली जाईल. शिष्‍यवृत्‍ती, सन्‍मानवृत्‍ती, जीवन गौरव पुरस्‍कार, संगीतसभांना (‘म्‍युझिक सर्कल्‍स’ना) अनुदान, महाविद्यालयीन पातळीवर शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम आयोजित करण्‍यासाठी अर्थसाहाय्य इ. उपक्रमांचा या योजनेत समावेश असेल.१५. ललित कला अकादमी – केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात दृश्यात्मक कलेसाठी कार्य करणार्‍या संस्थेची गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र ललित कला अकादमी स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्‍यात येईल. अकादमीच्या अंतर्गत सुयोग्य ठिकाणी कलाग्राम स्‍थापन करण्‍यात येईल. त्‍यामध्‍ये पुढील सुविधा असतील- धातू ओतशाळा (मेटल फाउंड्री), ग्राफिक्‍स स्‍टुडिओ, सिरॅमिक फाउंड्री, प्रदर्शनासाठी कलादालन, कार्यशाळा (वर्कशॉप शेड), भाडेतत्त्वावर आवश्यक तितके स्‍टुडिओ, खुले नाट्यगृह (ऍम्‍फी थिएटर), अतिथिगृह इत्यादी.१६. संतपीठ - पैठण येथे स्‍थापन झालेल्‍या संतपीठाचे कार्य तांत्रिक अडचणी दूर झाल्‍यानंतर त्‍वरित सुरु करण्‍यात येईल. हे संतपीठ सर्व धर्मांतील व जातींतील मानवतावादाचा पुरस्‍कार करणा-या संतांच्‍या विचारांचे व कार्याचे अध्‍ययन आणि अभ्‍यास करणारे केंद्र म्‍हणून विकसित करण्‍यात येईल. शिक्षक व अन्‍य शासकीय कर्मचारी, तसेच सर्वसामान्‍य जिज्ञासू यांच्‍यासाठी लघुमुदतीच्‍या अभ्‍यासक्रमांचे केंद्र, संतांच्‍या विचारांवर संशोधन करणा-या विद्यापीठ पातळीवरील विद्यार्थ्‍यांसाठी संदर्भालय आणि विविध धर्मांतील व जातींतील संतांच्‍या विचारांचा/कार्याचा तुलनात्‍मक अभ्‍यास करण्‍यासाठी महत्त्वाचे केंद्र म्‍हणून सदर संतपीठ विकसित करण्‍यात येईल.१७. परदेशात अध्यासने - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठात (अमेरिकेत) आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड विद्यापीठात (ब्रिटनमध्ये) अध्यासन निर्माण करण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल. ही अध्यासने शासनाच्या आर्थिक सहभागाबरोबरच त्‍या दोन्‍ही देशांतील तसेच आपल्‍या देशातील लोकांच्‍या सहकार्यातून निर्माण करण्‍याचे प्रयत्न करण्यात येतील.१८. सहजीवन शिक्षण - स्त्री-पुरुषांनी परस्परांना नीट समजावून घ्यावे, त्यांनी एकमेकांचा आदर करावा आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी पोषक ठरावे, असे सहजीवनाविषयीचे प्रबोधनात्मक शिक्षण शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना देण्यात येईल. यासाठी मानसशास्त्र, वैद्यकशास्त्र इत्यादी क्षेत्रांतील तज्ज्ञ व परिपक्व व्यक्तींकडून/शिक्षकांकडून असे शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात येईल.१९. लोकप्रतिनिधींसाठी प्रशासन प्रशिक्षण – ग्रामपंचायती, पंचायत समित्‍या, जिल्‍हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तसेच विधिमंडळामध्‍ये निवडून येणार्‍या लोकप्रतिनिधींना शासकीय योजना, संसदीय प्रणाली, प्रशासकीय व्यवस्था अशा राज्यव्यवहाराच्या सर्वांगीण माहितीबरोबरच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जगताची माहिती व्हावी, यासाठी ‘यशदा’सारख्या प्रशिक्षण संस्थेत अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. २०. प्रसारमाध्यम अवलोकन समिती - वृत्तपत्रे, तसेच इलेक्ट्रॉनिक व अन्य प्रसारमाध्यमे यांचे आविष्कारस्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या माध्यमांची अभिरुचिसंपन्नता व विश्वसनीयता टिकून राहावी आणि वृद्धिंगत व्हावी, त्यांनी व्यवस्थेतील अनिष्ट बाबी समाजाच्या निदर्शनाला आणण्याबरोबरच समाजात घडणार्‍या विधायक घडामोडींचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा असते. या दृष्टीने, त्यांच्याद्वारे प्रकाशित होणारा मजकूर/जाहिराती यांचे नियमित अवलोकन होणे अत्यावश्यक बनले आहे. याकरिता एका समितीचे गठन करण्याची गरज आहे. प्रत्येक प्रकारच्या माध्यमाच्या प्रतिनिधींनी आपणहून स्वयंशासनाच्या उद्देशाने अशी समिती स्थापन करावी, हे इष्‍ट ठरेल. काही कारणाने असे घडण्यात अडचणी येत असतील, तर शासन अशा प्रकारची समिती स्थापन करील. या समितीत माध्यमांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, न्यायपालिकेचे प्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, वाचक व प्रेक्षक यांचे प्रतिनिधी आणि शासनाचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्‍याबाबत दक्षता घेण्‍यात येईल. एखाद्या प्रसारमाध्यमातून जाणता-अजाणता सामाजिक सौहार्द बिघडेल अथवा शांतताभंग होईल अशा प्रकारचा अथवा इतर काही दृष्टींनी समाजविघातक मजकूर/दृश्ये प्रकाशित/प्रसारित झाल्यास समिती स्वत:हून अथवा कोणी ती बाब समितीच्या निदर्शनास आणल्यास त्याची दखल घेईल आणि भविष्यात या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित प्रकाशनाचे मालक/ संपादक यांच्या नजरेस आणून देईल. या समितीच्या कार्याचे स्वरूप सल्लागार समितीसारखे असेल. याशिवाय, पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी आणि उद्बोधनासाठी चर्चासत्रे, व्याख्याने, प्रकाशने असे उपक्रम समितीतर्फे आयोजित करण्यात येतील. पत्रकारांच्या संस्था/संघटना असे उपक्रम आयोजित करीत असतील, तर शासन त्याकरिता आर्थिक मदत देईल. तसेच, राज्य व राष्ट्र यांच्या हिताच्या विविध बाबी पत्रकारांच्या नजरेस आणून देण्याचे कार्य या समितीतर्फे वेळोवेळी करण्यात येईल. तसेच, विविध प्रसारमाध्यमांतून दिल्या जाणार्‍या बातम्या आणि सादर केले जाणारे वेगवेगळे उपक्रम यांची वस्तुनिष्ठता, ग्राह्याग्राह्यता, गुणवत्ता, विधायकता, अभिरुची इत्यादी बाबींचे योग्य आकलन व मूल्यमापन करण्याची क्षमता विकसित व्हावी, म्हणून माध्यमांचे वाचक, श्रोते व प्रेक्षक यांच्यासाठी या समितीमार्फत उपक्रम राबविले जातील. असे उपक्रम राबविणार्‍या अन्य व्यक्तींना/संस्थांना प्रोत्साहन/साहाय्य दिले जाईल. २१. कार्यालये व विभाग हस्तांतरण - शासकीय कामकाजात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले भाषा संचालनालय, मराठी भाषेच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली राज्य मराठी विकास संस्था, उर्दू भाषेसाठी कार्य करणारी उर्दू अकादमी, तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी/बृहन्महाराष्ट्र मंडळ वा तत्सम संस्था यांना साहाय्य करणे हे विषय सध्या सामान्य प्रशासन विभागाचे आहेत. ग्रंथालय संचालनालय उच्च शिक्षण विभागाकडे आहे. तसेच, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र साधनांसाठीच्या समित्याही याच विभागाकडे आहेत. लोकसाहित्य समिती शालेय शिक्षण विभागांतर्गत येते. या सर्व विषयांचा सांस्कृतिक कार्य विभागाशी जास्त जवळचा संबंध आहे. याकरिता हे सर्व विषय यापुढे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे असतील. तसेच, दृश्यात्मक कलांच्‍या शिक्षणाविषयीचा भाग उच्च शिक्षण विभागाकडे ठेवून त्या कलांविषयींच्या अन्य बाबी कला संचालनालयाकडे असतील आणि कला संचालनालय हे पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात येईल. दृश्यात्मक कलाविषयक संवर्धन, प्रशिक्षण, जतन, संस्थांना अनुदान, वयोवृद्ध कलाकार मानधन, पारितोषिके, प्रदर्शने, जीवन गौरव व अन्य पुरस्कार इत्यादी अन्य योजनांसाठी कला संचालनालय कार्य करील. उपरोक्त सर्व विषय व कार्यालये आर्थिक तरतूद व मंत्रालयीन प्रशासकीय यंत्रणेसह पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडे वर्ग करण्यात येतील.२२. सांस्कृतिक समन्वय समिती - साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रासाठी कार्य करणार्‍या राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध समित्या, मंडळे, महामंडळे, संचालनालये यांच्या कार्यात एकवाक्यता आणि समन्वय असावा, यासाठी या संस्था आणि कार्यालये यांच्या प्रमुखांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत ‘राज्य सांस्कृतिक समन्वय समिती’ स्थापन करण्यात येईल. या समितीची दर तीन महिन्यांतून एकदा बैठक घेण्यात येईल. या बैठकीत त्या संस्थांचे सुरू असलेले उपक्रम, प्रस्तावित उपक्रम, प्राधान्यक्रम इ. बाबत चर्चा होईल आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यात येईल. तसेच झालेल्‍या कामांचा आढावा घेण्‍यात येईल. ही समिती समन्वयाच्या दृष्टीने आवश्यक ते निर्णय घेईल.२३. समित्यांवरील नियुक्त्या - सांस्‍कृतिक कार्य, भाषा व साहित्‍य, दृश्यात्‍मक कला, शिक्षण, उच्‍च शिक्षण आदी क्षेत्रांतील योजनांसाठी शासनाकडून नियुक्‍त करण्‍यात येणा-या समित्‍या सर्वसमावेशक असतील. समितीचा कालावधी तीन वर्षे वा त्यापेक्षा कमी असल्यास त्या समितीवर कोणत्याही अशासकीय सदस्‍याची/अध्यक्षाची नियुक्ती जास्तीत जास्त दोन वेळा आणि तो कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त असल्यास फक्त एकदाच करण्यात येईल. २४. नियमित आढावा - सांस्‍कृतिक धोरणात समाविष्‍ट करण्‍यात आलेल्‍या सर्व बाबींच्‍या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेण्‍यात येऊन कार्यवाहीला योग्‍य ती गती देण्‍यासाठी पावले उचलण्‍यात येतील. यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नियुक्‍त करण्‍यात येईल. या समितीत संबंधित विभागाचे मंत्री व राज्यमंत्री, तसेच काही अशासकीय सदस्य व मुख्‍य सचिव यांच्यासह वित्‍त (व्‍यय), पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य, शालेय व क्रीडा, उच्‍च व तंत्रशिक्षण इ. विभागांच्‍या सचिवांचा समावेश असेल. समितीची बैठक ३ महिन्‍यांतून एकदा होईल.
४. भाषा आणि साहित्यज्ञानाचे संचयन आणि संक्रमण स्थलकालांच्या मर्यादा ओलांडू शकते, ते प्रामुख्याने भाषेमुळेच होय. संगीतनृत्यांपासून ते चित्रशिल्पांपर्यंत नानाविध कलांना अधिक आस्वाद्य बनविण्याचे कार्यही भाषा नक्कीच करते. ती एकीकडे व्याकरणाच्या आणि लेखनपद्धतीच्या नियमांचा मानही राखते आणि दुसरीकडे काळाच्या ओघात त्या नियमांच्या संहितेला वेगळे वळण देऊन आशयाला सतत ताजेपणाही देत राहते. ती ललित साहित्यापासून ते गंभीर विवेचनापर्यंत विविध मार्गांनी अंतर्बाह्य सृष्टीला अभिव्यक्त करते. भाषेचे हे अंगभूत सामर्थ्य ओळखून मराठी भाषेला अधिक विकसित करणे आवश्यक आहे. शब्दसृष्टी आणि साहित्य यांच्या बाबतीत पूर्वीपासूनच समृद्ध असलेली मराठी भाषा आधुनिक काळाची आव्हाने पेलण्यासाठी सर्व अंगांनी सतत विकास पावत संपन्न अशी ज्ञानभाषा व्हायला हवी. मराठी भाषा आणि देशातील व विदेशांतील भाषा यांच्यामध्ये परस्पर साहित्य-व्यवहार वृद्धिंगत झाल्यास मराठीची समृद्धी होण्याबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती सर्वदूर पोहचण्यास मदत होईल. शिवाय, आशयाच्या संपन्नतेबरोबरच मराठीची लेखनपद्धती तर्कशुद्ध, सुलभ आणि गतिमान करणेही गरजेचे झाले आहे. या सर्व बाबी ध्यानात घेऊन शासन मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी विविध उपक्रम अमलात आणेल.
लोकसंस्कृती १. लोकसाहित्य समिती - लोकसाहित्याचे संकलन व प्रकाशन करण्यासाठी कार्यरत असलेल्या लोकसाहित्य समितीला अधिक आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच या समितीचे कार्य अधिक व्यापक करण्यात येईल. २. आदिवासी कोश - महाराष्ट्रातील आदिवासींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र अभ्यास करून त्याचा कोश तयार करण्यात येईल. यासाठी वेगळे स्वतंत्र मंडळ नेमण्यात येईल अथवा हे कार्य पुणेस्थित आदिवासी संशोधन व प्रशिक्षण केंद्राकडे किंवा अशा प्रकारच्या संशोधनाचे कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांकडे/ विद्यापीठांकडे सोपविण्यात येईल.३. जाती-जमाती कोश - महाराष्ट्रातील विविध जातींचा आणि आदिवासींखेरीज इतर जमातींचा सामाजिक-सांस्कृतिक-मानववंशशास्त्रीय दृष्ट्या समग्र अभ्यास करून त्याचा कोश तयार करण्यात येईल. यासाठी वेगळे स्वतंत्र मंडळ नेमण्यात येईल अथवा 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'कडे हे काम सोपविण्यात येईल किंवा अशा प्रकारच्या संशोधनाचे कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांकडे/ विद्यापीठांकडे हे कार्य सोपविण्यात येईल.४. ग्रामीण जीवन कोश - शेती व तत्संबंधित पारंपरिक ग्रामीण जीवनाशी व व्यवसायांशी तसेच अन्य कारागिरांच्या व्यवसायांशी निगडित अनेक संज्ञा, संकल्पना आणि वस्तू काळाच्या ओघात लोप पावत चालल्या आहेत. अशा संज्ञा व संकल्पना यांचा सचित्र स्वरूपातील कोश तयार करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येईल. हे कार्य ‘लोकसाहित्य समिती’ वा तत्सम संस्था यांच्याकडे सोपविण्यात येईल.५. स्थित्यंतरांचा इतिहास - एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभापासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात झालेल्‍या सामाजिक-सांस्‍कृतिक स्थित्यंतरांचा इतिहास लिहिण्‍यात येईल. ‘राज्य साहित्य संस्कृती मंडळा’मार्फत हा प्रकल्प राबविण्यात येईल.६. फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळ - महात्‍मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, कार्य आणि लेखन याबाबतची सामग्री प्रकाशित करण्यासाठी सध्या अस्थायी स्वरूपात तीन समित्‍या कार्यरत आहेत. या तिन्ही महामानवांच्या कार्यांत व विचारांत एकवाक्यता आहे. म्हणून तिन्ही समित्यांच्या कार्यात समन्वय असणे व्यवहार्य ठरेल. शिवाय, या समित्यांचे कार्य अधिक गतिमान करणे, या कार्यात एकसूत्रता आणणे आणि त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतुदीसह व्यापक स्वरूपाची स्वतंत्र व स्थायी प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी ‘फुले-शाहू-आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन मंडळ’ स्थापन करण्‍यात येईल. या मंडळाच्या तीन समित्या मंडळाच्या अंतर्गत पण स्वतंत्रपणे कार्य करतील. त्‍यासाठी दरवर्षी गरजेनुसार स्‍वतंत्र आर्थिक तरतूद करण्‍यात येईल.७. सण कोश - राज्‍यामध्‍ये वर्षभरात विविध सण साजरे केले जातात. काही सणांना विशिष्‍ट गाव, शहर, प्रादेशिक विभाग इ. ठिकाणचे स्‍थानिक वेगळेपण व महत्त्व असते. एकच सण वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो, असेही घडते. हे सण हा सांस्‍कृतिक जीवनाचा महत्त्वाचा घटक आहे. म्‍हणून अशा सणांची माहिती कोशरुपाने प्रकाशित केली जाईल. हे कार्य ‘लोकसाहित्‍य समिती’कडे सोपविले जाईल.८. जत्रा आदींचे माहिती प्रकाशन - राज्‍यात गावोगाव विविध जत्रा, यात्रा, मेळे, उरूस, शीख समाजाचा हल्लाबोल, फेस्ता, फेअर इत्यादींचे आयोजन केले जात असते. या आयोजनांच्‍या प्रसंगी वैशिष्ट्यपूर्ण असे अनेक सांस्‍कृतिक उपक्रम राबविले जातात. अशा प्रकारचे उपक्रम हे महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक जीवनाचे एक महत्त्वाचे अंग आहे. अशा जत्रा आदींचा परिचय करुन देणा-या जिल्हावार माहिती पुस्तिका प्रसिद्ध करण्‍यात येतील. या पुस्तिकांच्‍या आधारे त्‍यांचा राज्‍य पातळीवरील कोश तयार करण्‍यात येईल. हे कार्य ‘लोकसाहित्‍य समिती’कडे सोपविले जाईल.९. जाती-जमाती भाषा कोश/संशोधन - महाराष्ट्रातील ज्या जाती-जमातींच्या मातृभाषा प्रमाण मराठीपेक्षा, मराठी बोलींपेक्षा अथवा हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू इत्यादी आधुनिक/अभिजात भाषांपेक्षा वेगळ्य़ा आहेत, त्यांच्या भाषांसाठी लिपी निश्चित करणे, कोश तयार करणे, तसेच त्यांचे मौखिक व लिखित साहित्य, रूढी, मिथके इत्यादींचे अध्ययन/संशोधन करणे इत्यादी उद्देशांनी कार्य करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य दिले जाईल.१०. अन्य साहित्य संमेलने अनुदान - मुख्य मानल्या गेलेल्या प्रवाहापेक्षा वेगळ्या प्रवाहातील जनसमूहांच्या आणि उपेक्षित वर्गांच्‍या मराठी साहित्य संमेलनांनाही त्या त्या संमेलनाच्या एकंदर स्वरूपावर आधारित अनुदान देण्यात येईल. ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ या संदर्भात प्रस्ताव तयार करील. ११. ग्रामीण विद्यार्थी मार्गदर्शन - ग्रामीण भागांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना शहरी भागात वावरताना भेडसावणार्‍या समस्यांची माहिती देणारे आणि त्या समस्यांवर मात करण्याविषयी, तसेच त्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या अंगभूत क्षमतांचा विकास आणि गुणवत्‍तेचा आविष्‍कार करण्‍याविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण आवश्यक असते. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अशा प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याविषयी शैक्षणिक संस्थांना सांगण्यात येईल.१२. अप्रयोगार्ह शब्द सूची - पूर्वी प्रचलित असलेले काही शब्‍द, वाक्प्रचार, म्‍हणी वगैरेंची प्रयोगार्हता आता वेगवेगळया कारणांनी कालबाह्य झाली आहे. आपले सार्वजनिक जीवन न्यायाधिष्ठित, संघर्षरहित, निकोप व अभिरुचिसंपन्न ठेवण्‍याच्‍या दृष्‍टीने असे वाक्प्रयोग टाळता यावेत म्हणून शिक्षक, पत्रकार, साहित्यिक, कलावंत, राजकीय नेते वगैरेंना अशा शब्‍दांची माहिती असणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी अशा शब्‍दांची सूची तयार करण्‍यात येईल. ‘यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी’ सारख्या (‘यशदा’सारख्या) संस्थेमार्फत अशी सूची तयार करण्यात येईल. इतिहास, समाजशास्‍त्र, भाषाशास्‍त्र इत्‍यादी स्वरूपाच्या लेखनामध्‍ये अशा शब्‍दांचा निर्देश करणे अपरिहार्य असल्‍यास तो निर्देश अपवाद म्‍हणून आणि निकोप हेतूने केला जावा, अशी अपेक्षा असेल. अप्रयोगार्ह शब्‍दांची काही उदाहरणे परिशिष्ट क्रमांक २ मध्ये दिली आहेत.
ग्रंथसंस्कृती१. कोश-आवृत्त्या - विषयवार परिभाषा कोशांच्या सुधारित व संवर्धित आवृत्त्या प्रकाशित करण्यात येतील आणि त्या मराठी भाषकांना सहज प्राप्त होतील, अशी व्यवस्था करण्यात येईल. सर्व अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयांना तसेच शाळा / महाविद्यालये / विद्यापीठे यांना हे कोश विकत घेणे बंधनकारक करण्यात येईल. २. विश्वकोश प्रकल्पाला चालना – २.१ विश्वकोशाचे जे नियोजित खंड अद्याप प्रकाशित झालेले नाहीत, ते लवकरच प्रकाशित केले जातील. २.२ विश्वकोश मंडळाचे सर्व खंड युनिकोडमध्ये टंकलिखित करून संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) उपलब्ध करून देण्यात येतील. विश्वकोशातील माहिती अद्ययावत करण्यासाठी सूचना करण्याची अभ्यासकांना मुभा असेल. पण ही माहिती विश्वकोश मंडळाने मंजूर केल्यानंतरच अधिकृत स्वरूपात समाविष्ट केली जाईल. २.३ पूर्वी प्रकाशित झालेल्‍या खंडांच्‍या नव्‍या आवृत्त्या तयार करताना त्‍यांच्‍यामध्‍ये नव्‍याने समाविष्‍ट करावयाच्‍या नोंदींची सूची करण्‍यासाठी योग्‍य ती यंत्रणा निर्माण करण्‍यात येईल. २.४ विश्वकोश निर्मिती मंडळासाठी लेखन करणार्‍या लेखकांच्या/अभ्यागत संपादकांच्या /करारपद्धतीवरील कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल. नोंदींचे काम तसेच प्रशासकीय काम करारपद्धतीने करून घेण्याची मंडळाला मुभा असेल. तसेच, आवश्यक असणारी व रिक्त असलेली स्थायी पदे त्वरित भरण्यात येतील. या सर्व बाबींसाठी शासन विश्वकोशाला भरीव स्वरूपात आर्थिक तरतूद उपलब्ध करून देईल.३. मराठी शब्द व्युत्पत्ती कोश - अनेकदा शब्दांमध्ये सामाजिक/सांस्कृतिक इतिहास अप्रकट स्वरूपात पिढया-न्-पिढया टिकून राहिलेला असतो. अलिकडच्या काळात मराठीमध्ये विविध मार्गांनी अनेक शब्दांची भर पडली आहे. तसेच, भाषाशास्त्र, व्युत्पत्तिशास्त्र इ. क्षेत्रांत झालेल्या संशोधनामुळे शब्दांच्या नव्या व्युत्पत्ती समोर येऊ लागल्या आहेत. समाजातील ज्या घटकांच्या बोलींकडे पूर्वी फारसे लक्ष जात नव्हते, अशा घटकांच्या बोलींमधील शब्दांच्या व्युत्पत्तींचा शोध घेण्याचीही गरज निर्माण झाली आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन मराठी भाषेतील शब्दांच्या व्युत्पत्ती देणारा एक अद्ययावत असा ‘मराठी शब्द व्युत्पत्ती कोश’ तयार करण्यात येईल. त्यासाठी एक मंडळ नेमून ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’मार्फत ही कार्यवाही करण्यात येईल.४. दुर्मिळ ग्रंथ संचयिका - महाराष्ट्रातील संस्थांना/सार्वजनिक ग्रंथालयांना ३१ डिसेंबर १९०० या दिवशी अथवा त्यापूर्वी प्रकाशित झालेले ग्रंथ ग्रंथालय संचालनालयाच्या संमतीशिवाय निकालात काढता येणार नाहीत. जे ग्रंथ विशिष्ट कारणाने महत्त्वपूर्ण असतील, ते ग्रंथ निकालात काढण्याची परवानगी देण्यात येणार नाही. त्या ग्रंथांचे जतन करण्यासाठी ‘दुर्मिळ ग्रंथ संचयिका’ स्थापन करण्यात येईल. ही कार्यवाही करण्यासाठी ग्रंथालय संचालनालय तज्ज्ञांची समिती नेमेल.५. दुर्मिळ ग्रंथ सूची - महाराष्ट्रात शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली सुमारे सव्वाशे ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयांमध्ये आणि इतरही काही ग्रंथालयांमध्ये १ जानेवारी १९०१ पूर्वी प्रकाशित झालेली अनेक पुस्तके आहेत. या ग्रंथालयांकडे/ व्यक्तिगत संग्रहांमध्ये असलेल्या अशा पुस्तकांचे तपशील मागवून घेण्यात येतील. महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषकांनी उभारलेली ग्रंथालये व इतर संस्था यांच्याकडे अशी पुस्तके उपलब्ध असतील, तर त्यांचाही तपशील मागवून घेण्यात येईल. ग्रंथालय संचालनालयामार्फत अशा ग्रंथांची सूची संशोधकांसाठी प्रसिद्ध करण्यात येईल.६. दुर्मिळ मराठी ग्रंथ संकेतस्‍थळावर - स्‍वामित्‍व अधिकाराची मुदत संपलेले अनेक मराठी ग्रंथ सध्‍या उपलब्‍ध होत नाहीत. अशा दुर्मिळ आणि महत्त्वाच्या ग्रंथांची सूची महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळामार्फत तयार करण्‍यात येईल. हे ग्रंथ स्‍वतंत्र संकेतस्‍थळावर सहज उपलब्‍ध होतील, अशी व्‍यवस्‍था करण्‍यात येईल. ७. शासकीय प्रकाशने, छपाई व विक्री - ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘विश्वकोश निर्मिती मंडळ’, ‘भाषा संचालनालय’, ‘राज्य मराठी विकास संस्था’ यांना तसेच ग्रंथ प्रकाशित करणार्‍या राज्य शासनाच्या कोणत्याही इतर यंत्रणेला सध्या शासकीय मुद्रणालयामधूनच ग्रंथ छापून घेण्याचे आणि या ग्रंथांची विक्री शासकीय ग्रंथविक्री भांडाराद्वारेच करण्याचे बंधन आहे. त्यामुळे या ग्रंथांची आवश्यक तेव्हा छपाई करून मिळत नाही तसेच, जनतेला हे ग्रंथ सुलभतेने मिळत नाहीत. या सर्व संस्थांना आपले ग्रंथ खाजगीरीत्या छापून घेण्याची आणि त्यांच्या विक्रीसाठी स्वत:ची यंत्रणा उभारण्याची मुभा असेल.८. शासकीय ग्रंथ पुनर्निर्मिती – ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’, ‘विश्वकोश निर्मिती मंडळ’, ‘भाषा संचालनालय’, ‘राज्य मराठी विकास संस्था’ वा अन्य शासकीय संस्था यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथांची पुनर्निर्मिती करण्याचे अधिकार या संस्थांना असतील. या संस्था अशा ग्रंथांची पुनर्निर्मिती करणार नसतील आणि लोकांकडून अशा ग्रंथांची मागणी असेल, तर या संस्था हे ग्रंथ खाजगी प्रकाशकांना प्रकाशित करण्यासाठी देऊ शकतील.९. ग्रंथांची शासकीय खरेदी – महाराष्ट्रात प्रकाशित होणार्‍या पुस्तकांच्या खरेदीसाठी ग्रंथालय संचालनालय राज्यातील ग्रंथालयांना अनुदान देते, त्याचप्रमाणे स्वत: ग्रंथ खरेदी करून ते ग्रंथालयांना वितरित करते. त्यासाठी ग्रंथ निवड समिती नियुक्त करण्यात येते. या निवड समितीच्या रचनेत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल. मान्यताप्राप्त ग्रंथालयांना परिरक्षण अनुदान देण्यात येते, त्यातून ५० टक्के खर्च वेतनावर व ५० टक्के खर्च वाचनसाहित्यासह वेतनेतर बाबींवर करण्यात येतो. या अनुदानाच्या रकमेत दरवर्षी ५ टक्के वाढ करण्यात येईल.१०. ग्रंथोत्सव – राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी ग्रंथोत्सव आयोजित करण्यात येईल. स्थानिक साहित्य संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी ग्रंथोत्सवाचे आयोजन करतील. प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते यांना ग्रंथविक्रीसाठी आणि ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हा या आयोजनाचा मुख्य उद्देश असेल. शिवाय, या ग्रंथोत्सवाच्या अंतर्गत साहित्यविषयक उपक्रमही आयोजित करण्यात येतील. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’मार्फत जिल्हाधिकार्‍यांना अनुदान देण्यात येईल. महाराष्ट्राबाहेरील महत्त्वाच्या शहरांमध्येही मंडळ स्वत: अशा उपक्रमांचे आयोजन करील.११. ग्रंथसंस्कृती जोपासना - राज्यात ग्रंथसंस्‍कृती वृद्धिंगत करण्‍याचे प्रयत्‍न केले जातील. महिन्यातून एकदोनदा एकत्र जमून ग्रंथचर्चा, ग्रंथसमीक्षण, साहित्यविषयक चर्चा इ. उपक्रम राबविणा-या संस्‍थांना राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत प्रोत्साहनपर अनुदान देण्‍यात येईल. राज्‍यात अशा संस्‍थांचे एक जाळेच निर्माण व्‍हावे, असे प्रयत्‍न केले जातील.१२. वाङ्मय पुरस्कार निवड सुधारणा- राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणार्‍या वाङ्मय पुरस्कारांसाठीच्या सध्याच्या निवडप्रक्रियेनुसार निवड समितीच्या अध्यक्षांच्या सल्ल्याने प्रत्येक लेखनप्रकारासाठी एक परीक्षक नेमला जातो आणि हा परीक्षक त्या लेखनप्रकारातील उत्कृष्ट पुस्तकांची निवड करतो. या निवडी त्या लेखनप्रकारासाठी परीक्षक म्हणून नेमलेल्या एका व्यक्तीच्या दृष्टीकोणापुरत्या मर्यादित राहू नयेत, म्‍हणून निवड समितीच्या अध्यक्षांसह समितीतील अन्य ५ ते ६ परीक्षकांनी सर्व पुरस्कारांची अंतिम निवड करावी, याकरिता निवडप्रक्रियेत सुधारणा करण्यात येईल.१३. इंग्रजी भाषेतील ग्रंथांना पुरस्कार – मराठी मातृभाषा असलेल्या व्यक्तींनी इंग्रजीमध्ये स्वतंत्ररीत्या लिहिलेल्या उत्कृष्ट ग्रंथांना वाङ्मय पुरस्कार देण्यात येतील. जागतिक स्तरावर इंग्रजी भाषेतील ग्रंथव्यवहाराचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्‍यात येईल. १४. भारतीय भाषांतील ग्रंथांना पुरस्कार - मराठी मातृभाषा असलेल्या व्यक्तींनी इंग्रजीखेरीज अन्य भारतीय भाषांमध्ये स्वतंत्ररीत्या लिहिलेल्या सर्जनशील व वैचारिक उत्कृष्ट ग्रंथांना वाङ्मय पुरस्कार देण्यात येतील.१५. अमराठी लेखकाला पुरस्कार - मराठीपेक्षा वेगळी मातृभाषा असलेल्या देशी/परदेशी लेखकांनी/संशोधकांनी मराठीत किंवा महाराष्ट्रविषयक लिहिलेल्या उत्कृष्ट ग्रंथांना वाङ्मय पुरस्कार देण्यात येतील. १६. ‘महाराष्ट्र’ वार्षिकी - केंद्र शासनाच्या ‘इंडिया’ या वार्षिकीच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचा आढावा घेणारी वार्षिकी दरवर्षी प्रकाशित करण्यात येईल. या वार्षिकीत शासनाच्या विभागांशी संबंधित मूलभूत आकडेवारी आणि महत्त्वाच्या योजना यांची माहिती देण्यात येईल. त्याशिवाय जिल्हावार पुस्तिका नियमितपणे प्रकाशित करण्यात येतील.१७. ‘लोकराज्य’-प्रादेशिक विभागांचा आढावा - ‘लोकराज्य’ या मासिकाचे स्वरूप महाराष्ट्राचे विविध विभाग, समाजाचे विविध स्तर, सामाजिक-सांस्कृतिक जीवनाची विविध क्षेत्रे इत्यादी अंगांनी सर्वसमावेशक करण्यात येईल. या मासिकात महाराष्ट्राच्या विविध भागांतील घडामोडींचा आणि घटनांचा विभागवार आढावा घेण्यात येईल. सर्व प्रादेशिक विभागांतील वाचकांना सर्व विभागांचा आढावा वाचता येईल, या पद्धतीने तो प्रत्येक अंकाच्या सर्व प्रतींतून प्रसिद्ध करण्यात येईल. ‘लोकराज्य’चे विशेषांक अधिक प्रमाणात प्रकाशित करण्यात येतील.
बृहन्महाराष्ट्र १. बृहन्महाराष्ट्र परिचय पुस्तिका - बृहन्महाराष्ट्रातील तसेच विदेशांतील मराठी भाषकांच्या संस्थांचे स्वरूप, उद्दिष्टे, कार्य इत्यादींचा परिचय करून देणारी पुस्तिका प्रकाशित करण्यात येईल. ‘राज्य मराठी विकास संस्था’ यासाठी योजना तयार करील व राबवील.२. बृहन्महाराष्ट्र मंडळे साहाय्य - महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती या संदर्भात कार्य करणार्‍या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणार्‍या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल. ३. संस्‍कृती परिचय अभ्यासक्रम - अलिकडच्‍या काळात महाराष्‍ट्रीय व्‍यक्‍ती शिक्षण, नोकरी, व्‍यवसाय, वास्‍तव्‍य, पर्यटन इ. उद्देशांनी परप्रांतांत वा परदेशांत मोठया संख्‍येने जाऊ लागल्या आहेत. अशा उद्देशांनी प्रवास करणार्‍या व्‍यक्‍तींना त्‍या त्‍या ठिकाणची सांस्‍कृतिक मूल्‍ये, शिष्‍टाचार, कायदेकानून, वेशभूषा, संभाषणशैली, आहार, हवामान इत्यादींची योग्य ती माहिती असणे आवश्‍यक असते. तसेच, महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीविषयीही मूलभूत आणि वस्तुनिष्ठ माहिती असणे आवश्यक असते. सांस्कृतिक देवाण-घेवाण विधायक रीतीने होण्यासाठी आणि तिथल्या वास्तव्यात समायोजन होण्यासाठी अशी दोन्ही प्रकारची माहिती उपकारक ठरते. अशा प्रकारे अन्‍यत्र जाऊ इच्छिणा-या महाराष्ट्रीय/मराठी व्‍यक्‍तींना या बाबतीत मार्गदर्शन करण्‍यासाठी विद्यापीठ पातळीवर लघुमुदतीचे अभ्‍यासक्रम सुरू करण्‍यात येतील.
अनुवाद१. मराठीचा वापर व दुभाषांची मदत - राज्य शासनाचे मंत्री, प्रशासकीय प्रमुख, तसेच विभागप्रमुख इ. मान्यवरांनी शासकीय, सार्वजनिक कार्यक्रमांत बोलताना शक्यतो मराठी भाषेत बोलावे, अशी अपेक्षा ठेवण्यात येईल. अमराठी, विशेषत: परदेशांतील प्रतिनिधी यांच्या समवेत होणा-या अधिकृत बैठका/ कार्यक्रम यांमध्ये संवाद साधताना मराठीचे भाषांतर करण्यासाठी दुभाषाची/ अनुवादकाची मदत घेण्यात येईल. त्यामुळे मराठीचे महत्त्वाचे स्थान अधोरेखित होईल, मराठी भाषकांचे अनुवादकौशल्य विकसित करण्यासाठी चालना मिळेल आणि मराठी भाषकांना अनुवादक म्हणून व्यवसायही प्राप्त होईल.२. अनुवाद प्रशिक्षण - मराठी-इंग्रजी, मराठी-हिंदी आणि इंग्रजी-मराठी, हिंदी-मराठी अशा अनुवादाच्या प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम राज्य मराठी विकास संस्थेमार्फत सुरू करण्यात येतील. तसेच, अनुवादविषयक कार्यशाळा/ शिबिरे आयोजित करण्यात येतील. इतर भाषांच्या बाबतीतही आवश्यकतेनुसार शक्य तिथे असे प्रयत्न करण्यात येतील.३. मराठी ग्रंथ अनुवाद प्रोत्साहन - मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषत: हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविण्यात येईल. ‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ’ / ‘मराठी भाषा विकास संस्था’ यांच्यामार्फत ग्रंथांतील मजकुराचा थोडक्यात सारांश आणि लेखकाचा परिचय हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अखिल भारतीय स्तरावरच्या सर्व भाषांमधील महत्त्वाच्या प्रकाशकांना पाठविण्यात येईल. येथून पुढे ज्या ग्रंथांना शासनातर्फे पुरस्कार देण्यात येतील, ते ग्रंथ यासाठी निवडले जातील.४. संतवचनांचे अनुवाद - महाराष्ट्रातील संतांच्या निवडक वचनांचे अनुवाद देशातील भाषांमध्ये, तसेच परदेशांतील काही महत्त्वाच्या भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येतील. महाराष्ट्राबाहेरील भारतीय संतांच्या निवडक वचनांचे अनुवाद मराठी भाषेमध्ये प्रकाशित करण्यात येतील.५. इंग्रजी भाषेवर प्रभुत्‍व – सध्‍या इंग्रजी भाषेला वेगवेगळया कारणांनी जागतिक पातळीवर पूर्वीपेक्षाही अधिक महत्त्वाचे स्‍थान प्राप्‍त झाले आहे. विविध क्षेत्रात जगभर होणारे अत्‍याधुनिक संशोधन आणि इतर घडामोडी यांची माहिती त्‍वरित उपलब्‍ध होण्‍यासाठी, ती माहिती तत्‍परतेने मराठीमध्‍ये भाषांतरित करण्‍यासाठी, तसेच नोकरी, व्‍यवसाय इ. बाबतीत यश मिळविण्‍यासाठी मराठी भाषकांना इंग्रजी भाषा उत्‍तम रीतीने अवगत होणे गरजेचे झाले आहे. त्‍यांना लिखित व मौखिक इंग्रजीचे नीट आकलन, तसेच इंग्रजीमध्‍ये प्रभावी लेखन आणि प्रवाही संभाषण या मार्गांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्‍व प्राप्‍त करता यावे, यासाठी राज्‍य शासन विविध उपक्रम राबवील. शालेय आणि महाविद्यालयीन स्‍तरांवरील अध्‍यापनाबरोबरच बहिःशाल स्‍वरुपात इंग्रजीचे शिक्षण उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी संभाषणाचे वर्ग, अनुवादाच्‍या कार्यशाळा इ. उपक्रमांना शासन अर्थसहाय्य देईल.
अमराठी भाषकांसाठी उपक्रम१. अन्य भाषांसाठी अकादमी - महाराष्ट्र शासनाने हिंदी, गुजराती, सिंधी आणि उर्दू भाषांतील साहित्यासाठी चार स्वतंत्र अकादमी स्थापन केल्या आहेत. यांपैकी प्रत्येक अकादमीला दरवर्षी आवश्यकतेनुसार पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात येईल. या अकादमींची माहिती गुजरात शासनाला कळविण्यात येईल. गुजरात राज्याची मातृभाषा असलेल्या गुजराती भाषेची अकादमी महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली आहे, त्याच धर्तीवर गुजरात राज्याने मराठी अकादमीची स्थापना करावी, अशी विनंती गुजरात शासनाला करण्यात येईल. याच पद्धतीने हिंदी मातृभाषा असलेल्या राज्य शासनांना या अकादमींची माहिती कळवून त्यांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मराठी अकादमीची स्थापना करण्याची विनंती करण्यात येईल.२. अमराठी भाषकांसाठी प्रकाशने - मराठी भाषेखेरीज एखादी अन्य भारतीय/विदेशी भाषा ही ज्यांची मातृभाषा असेल, त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी आवश्यक अशा पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल. तसेच, त्या भाषांतील शब्दांचे मराठी अर्थ देणार्‍या आणि मराठी भाषेतील शब्दांचे त्या भाषांतील अर्थ देणार्‍या शब्दकोशांची निर्मिती करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येईल. या प्रकल्पासाठी आवश्यकता असल्यास परदेशस्थ महाराष्ट्रीय व्यक्तींचा/संस्थांचा आर्थिक व अन्य प्रकारचा सहभाग मिळविण्यात येईल. यासाठी आवश्यक ती योजना ‘राज्य मराठी विकास संस्था’ किंवा ‘राज्‍य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ तयार करील.३. अमराठी भाषकांसाठी व्यवहारोपयोगी मराठी – अमराठी भाषकांसाठी व्यवहारोपयोगी मराठी शिकविण्याची सोय उपलब्ध करून देणार्‍या व्यक्तींना/संस्थांना प्रोत्साहन देण्यात येईल.
लेखन१. युनिकोडचा अधिकृत वापर – संगणक माध्यमात देवनागरी लिपीच्या उपयोगाबाबत सर्वत्र एकवाक्यता नसल्याने मराठीतून संगणकीय संवाद साधण्यास मर्यादा येतात. म्‍हणून, जागतिक पातळीवर सर्व प्रमुख संस्थांनी एकत्र येऊन युनिकोडच्या अंतर्गत विकसित केलेल्या देवनागरी लिपीच्या प्रमाणित संस्करणाचा शासनव्यवहारात अधिकृत वापर करणे बंधनकारक करण्यात येईल. त्यामुळे सर्वसामान्य जनता आणि शासन यांना संगणकाच्या माध्यमातून परस्परांशी संवाद साधणे सोपे होईल. आवश्यकता असल्यास संबंधितांकडून युनिकोडमधील त्रुटी दूर करण्यात येतील. २. ‘शुद्ध’ नव्हे, ‘प्रमाण’ लेखन - लेखनाच्या बाबतीत सर्वत्र आणि विशेषत: अध्ययन-अध्यापन या क्षेत्रात प्रमाण लेखनाला शुद्धलेखन संबोधले जाते. त्याऐवजी प्रमाण लेखन असे संबोधण्यात येईल.३. मुद्द्यांच्या मांडणीसाठी वर्णक्रम - लेखनामध्‍ये एखाद्या मुद्द्याच्‍या मांडणीचे विशिष्‍ट पद्धतीने वर्गीकरण करताना क्रमशः ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ इत्यादी अक्षरांचा उपयोग करून उपमुद्द्यांची मांडणी करण्‍याची पद्धत आपल्‍याकडे बरीच रूढ झाली आहे. ही अक्षरे इंग्रजी भाषेतील ‘A’, ‘B’, ‘C’, ‘D’ इ. वर्णांचा क्रम व उच्‍चार यांना अनुसरणारी आहेत. मराठी भाषेमध्‍ये लेखन करताना अशा प्रकारे इंग्रजी वर्णमालेतील वर्णांचा क्रम अनुसरण्‍याऐवजी मराठी वर्णमालेनुसार ‘अ’, ‘आ’, ‘इ’, ‘ई’ इत्यादी अक्षरांचा उपयोग करण्‍याची पद्धत स्‍वीकारण्‍यात येईल.४. कार्यक्रमफलक मराठीत - राज्य शासनाच्या सर्व कार्यक्रमांत मंचावर दर्शनी भागात लावण्यात येणार्‍या माहितीफलकावरील कार्यक्रमविषयक मजकूर प्रथम ठळक अक्षरात मराठीमध्ये असेल आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार अन्य भाषेत/भाषांत असेल.५. सूचनाफलक लेखन - शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे इ. ठिकाणी मराठी भाषेतून विविध सूचना देणारे फलक लावले जात असतात. अशा फलकांवरील सूचनांचे लेखन प्रमाण मराठी भाषेच्‍या नियमांचे पालन करणारे असावे, अशी अपेक्षा असते. या सूचना फलकांवर लिहिण्‍यापूर्वी त्‍या बिनचूक असल्‍याची खातरजमा जाणकार व्यक्तींकडून करून घेण्‍याविषयी संबंधितांना सांगण्‍यात येईल. सूचनाफलक लावण्‍याच्‍या प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्‍हणून या बाबीकडे पाहिले जाईल.
५. प्राच्यविद्या पौर्वात्य देशांच्या सर्वांगीण अभ्यासासाठी विकसित करण्यात आलेली ज्ञानशाखा म्हणजे प्राच्यविद्या. भारतविषयक अशाच अभ्यासासाठी असलेल्या ज्ञानशाखेला भारतविद्या म्हणतात. प्राचीन/प्राचीनोत्तर भूतकालीन पदार्थ व घटना यांचे अध्ययन इ. करणारी पुरातत्त्वविद्या, महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी असलेले पुराभिलेखागार इत्यादींचा अंतर्भाव प्राच्यविद्येच्या क्षेत्रात होतो. प्राचीन वास्तू , उत्खननात सापडलेल्या वस्तू , शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखिते, इतर महत्त्वपूर्ण कागदपत्रे इत्यादींचे संकलन व संशोधन हे आपला समग्र वारसा नीट रीतीने कळण्यासाठी आवश्यक असते. महाराष्ट्राची संस्कृती ही भारतीय संस्कृतीचे एक अत्यंत महत्त्वाचे व अविभाज्य अंग आहे. शिवाय, प्राच्यविद्येच्या दृष्टीने पाहता महाराष्ट्राला अत्यंत समृद्ध व अभिमानास्पद वारसा लाभला आहे. मराठी लोकांना या वारशाचे यथार्थ भान लाभावे आणि महाराष्ट्राबाहेरील संशोधक, पर्यटक इत्‍यादींना त्याचा यथोचित परिचय व्हावा, यासाठी राज्यशासन विविध उपक्रम राबवील. १. ऐतिहासिक दस्तावेज सल्लागार समिती - महाराष्ट्रात ठिकठिकाणी विखुरलेली आणि अद्याप प्रकाशात न आलेली ऐतिहासिक कागदपत्रे संकलित होणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वाङ्मयीन अशा समग्र इतिहासाच्या लेखनासाठी या साधनांची जपणूक व्हावी आणि ही साधने अभ्यासकांना उपलब्ध व्हावीत, म्हणून ती शोधून काढणे आणि मिळवणे गरजेचे आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या अभिलेखागाराच्या अंतर्गत ‘महाराष्ट्र ऐतिहासिक दस्तावेज सल्लागार समिती’ स्थापन करण्यात येईल. ही समिती न्यायालयीन निवाडे, पत्रव्यवहार, दैनंदिनी, छायाचित्रे, हिशोबाच्या वह्या इत्यादी कागदपत्रे मिळवेल. ज्या खाजगी संस्था अथवा व्यक्ती यांच्याकडे अशी ऐतिहासिक महत्त्वाची साधने असतील, ती त्या व्यक्तींनी/संस्थांनी दिल्यास ती पुराभिलेख संचालनालयामार्फत स्वीकारून त्यांचे जतन करण्याची व्यवस्था केली जाईल. ही कागदपत्रे मूळ स्वरूपात मिळविण्यात येतील अथवा आवश्यकता वाटल्यास ती संगणकीय (डिजिटाईज्ड) स्वरूपात मिळविण्यात येतील.२. जिल्हा/तालुका वस्तुसंग्रहालये - सांस्कृतिक महत्त्व असलेल्या परंतु विस्मृतीत चाललेल्या वस्तू उत्खनन वगैरे करताना सार्वजनिक ठिकाणी प्राप्त झाल्यास किंवा कोणा व्यक्तींनी उपलब्ध करून दिल्यास त्या वस्तूंची संग्रहालये त्या परिसरातच जिल्हा/तालुका पातळीवर उभी करण्यात येतील. या वस्तू त्या परिसरातून अन्यत्र नेण्यास परवानगी असणार नाही. अशी संग्रहालये उभी करण्यास या क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्थांना पुरातत्त्व संचालनालयामार्फत प्रोत्साहन देण्यात येईल.३. संस्कृत, पाली व अर्धमागधी भाषा–प्रोत्साहन - संस्कृत, पाली आणि अर्धमागधी या भाषांतील उत्तम ग्रंथांचा मराठी भाषेत अनुवाद करणार्‍या व्यक्तींना/संस्थांना अनुवाद प्रकाशित करण्यासाठी अर्थसाहाय्य देण्यात येईल. तसेच, अध्ययन, अध्यापन, संशोधन, कोशनिर्मिती इ. बाबतीत या भाषांच्या व्यासंगाला प्रोत्साहन व आवश्यक ते अर्थसाहाय्य दिले जाईल. यासाठी ‘राज्य मराठी विकास संस्था’ किंवा ‘साहित्य आणि संस्कृती मंडळ’ योजना तयार करील व अमलात आणेल.४. अमूर्त वारशाची जोपासना - किल्‍ले, गड, शस्‍त्र, चित्र या मूर्त गोष्‍टींशिवाय मौखिक परंपरा, लोकपरंपरा, भाषांच्या बोली, पारंपरिक विधी, उत्सव, पारंपरिक प्रयोगात्म कला इत्यादी विविध अमूर्त सांस्‍कृतिक परंपरा हे प्रत्‍येक समाजाचे वैशिष्‍ट्य असते. युनेस्‍को या जागतिक संघटनेने अशा पारंपरिक सांस्‍कृतिक बाबींचे जतन करण्‍यासाठी साहाय्य करण्याच्या दृष्टीने अशा बाबींची निवड करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. महाराष्‍ट्राच्या सांस्कृतिक जीवनात अशा पारंपरिक वारशाच्‍या अनेक बाबी आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्‍या समितीमार्फत त्या निश्चित करण्‍यात येतील. त्‍यासाठी युनेस्‍कोचे साहाय्य मिळविण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करण्‍यात येईल.५. स्थलवैशिष्ट्ये-माहिती पुस्तिका - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे ज्ञान योग्य रीतीने एकत्र प्राप्त व्हावे म्हणून महाराष्ट्रातील किल्ले, इतर ऐतिहासिक स्थळे, विविध धर्मांची/संप्रदायांची तीर्थक्षेत्रे, लेणी, विख्यात व्यक्तींच्या चरित्राशी संबंधित स्थाने, नैसर्गिक वैशिष्ट्ये असलेली स्थळे, वस्तुसंग्रहालये, प्राणिसंग्रहालये, अभयारण्ये, आधुनिक काळातील महत्त्वाचे विकासप्रकल्प इत्यादी महत्त्वपूर्ण स्थानांची तपशीलवार माहिती देणारे नकाशे व माहितीपुस्तिका मराठीबरोबरच हिंदी व इंग्रजी भाषांमधून तयार केल्या जातील, तसेच त्या त्या ठिकाणी स्थलवैशिष्ट्ये सांगणारे फलक मराठीमध्ये ठळकपणे आणि त्यासोबत हिंदी व इंग्रजी या भाषांमधूनही लावण्यात येतील. ही कार्यवाही महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत केली जाईल. त्या स्थानांच्या नोंदींबरोबरच त्यांचे योग्य रीतीने जतन, तेथील परिसराचा विकास, तेथे जाण्यासाठी योग्य रस्त्यांची निर्मिती इ. बाबतीतही राज्य शासन आवश्यक ती पावले उचलेल.६. दिशानिर्देशक व नामफलक - महाराष्ट्रात भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाची अनेक स्थळे आहेत. अशा स्थळांच्या जवळून जाणार्‍या प्रमुख मार्गांवर त्या स्थळांचा नामोल्लेख करणारे आणि दिशा, अंतर इत्यादींचा निर्देश असणारे फलक लावण्यात येतील. तसेच, महाराष्ट्रात नद्यांवर ज्या ठिकाणी पूल बांधण्यात आलेले आहेत, त्या ठिकाणी पुलांवरून जाणार्‍या प्रवाशांना ठळकपणे दिसेल अशा रीतीने त्या त्या नदीचे नाव लिहिलेले फलक लावण्यात येतील. हे फलक आधी मराठीत आणि नंतर हिंदी व इंग्रजी भाषांमध्‍ये असतील.७. पर्यटन मार्गदर्शन उद्बोधन - समाजाच्‍या विविध अंगांचा जो इतिहास लिहिला जात असतो, त्‍याचे नवनव्‍या संशोधनाच्‍या आधारे पुनर्लेखन करण्‍याची प्रक्रिया अखंडपणे चालू असते. अशा संशोधनामुळे ऐतिहासिक तथ्‍यांच्‍या मांडणीमध्‍ये बदल करणे आवश्‍यक असते. विविध पर्यटनस्‍थळी कार्य करणार्‍या शासनमान्‍य मार्गदर्शकांचे इतिहासविषयक ज्ञान अद्ययावत करण्यासाठी उद्बोधनवर्ग आयोजित करण्‍यात येतील. कोणी मार्गदर्शक पर्यटकांना चुकीची वा पूर्वग्रहदूषित माहिती देणार नाही, याची दक्षता घेण्‍यात येईल. याबाबतचे उपक्रम पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने पुरातत्त्व अथवा पुराभिलेख संचालनालयामार्फत राबविण्यात येतील.८. पुराभिलेखागारांचे आधुनिकीकरण - राज्य शासनाच्‍या पुराभिलेखागारांचे कालानुरूप आधुनिकीकरण करण्‍यात येईल. ९. मोडी लिपी, फार्सी-अरबी भाषा शिक्षण - महाराष्ट्राच्या इतिहासाच्या नोंदी मोडी लिपीत तसेच फार्सी आणि अरबी या भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून मोडी लिपी तसेच फार्सी व अरबी भाषा शिकण्यासाठी अधिक प्रमाणात चालना देण्यात येईल. आवश्यकतेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येतील. त्याबरोबरच त्यांच्यामधील साहित्याचे अनुक्रमे देवनागरीत लिप्यंतर आणि मराठीमध्ये भाषांतर करण्याच्या योजना कार्यान्वित केल्या जातील.