महाराष्ट्र जागतिक धम्म केंद्र शक्य - डॉ. आ. ह. साळुंखे
कोल्हापूर, ता. ९ - जगभर सध्या गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास होत आहे. महाराष्ट्राच्या डोंगराळ भागाचा विचार केला तर जगात सर्वाधिक गुंफा येथे आहेत. संशोधन आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याचा विचार केल्यास जागतिक धम्म आणि पर्यटन केंद्र म्हणून विकास करता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. येथील डॉ. सुभाष देसाईलिखित "महायोगी गौतम बुद्ध' पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झाले. डॉ. साळुंखे म्हणाले, ""धुक्यातून सूर्याकडे पाहावं, तसं पूर्वीपासून बुद्धांकडे पाहिले गेले. त्यामुळे त्यांचे खरे स्वरूप कुणालाच समजू शकले नाही. आधुनिक काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवी प्रक्रिया सुरू केली. त्यांना मराठीतील पहिल्या असणाऱ्या केळुस्करांच्या गौतम बुद्धांवरील पुस्तकामुळे खरी प्रेरणा मिळाली. १९१२ मध्ये सयाजीराव घोरपडे यांनी बडोदा संस्थानात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली. परिवर्तनामुळे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाकडे सकारात्मक विचाराने लोक पाहू लागले.'' छोटीशी चिमणीदेखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते, मग प्रत्येक माणसालाही असं स्वातंत्र्य असलेच पाहिजेत. त्याची जाणीव प्रत्येक माणसाला झाली पाहिजे, यासाठी बुद्धांचे तत्त्वज्ञान मार्गदर्शक ठरले आहे, असेही ते म्हणाले. डॉ. डी. वाय. पाटील म्हणाले, ""गौतम बुद्ध हे अखिल मानवजातीचे उद्धारकर्ते आहेत. माणसांमध्येच ईश्वर असतो, ही दृष्टी त्यांनी दिली. सुख आणि दुःख हे माणसाच्या मनातील जन्म आहेत. कृतज्ञता म्हणजे पुण्य आणि कृतघ्नता म्हणजे पाप असते, ही त्यांची शिकवण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अधिक मोलाची आहे.'' या वेळी डॉ. ज. रा. दाभोळे, डॉ. विश्वनाथ मगदूम, ऍड. प्रकाश हिलगे, सर्जेराव देसाई आदी उपस्थित होते.
1 comment:
really very usefull and truthfull said !thanks plz keep writing ! All the best wishes !
Post a Comment